‘गारठा’ संपला, कोल्हापुरात तापमानाचा पारा चढला
By संदीप आडनाईक | Published: February 6, 2024 06:56 PM2024-02-06T18:56:57+5:302024-02-06T18:57:16+5:30
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरचे तापमान जाणवण्याइतपत वाढले आहे. दिवसभरात तापमान ३४ अंश सेल्सिअस होते. आठवडाभर हे तापमान ...
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरचे तापमान जाणवण्याइतपत वाढले आहे. दिवसभरात तापमान ३४ अंश सेल्सिअस होते. आठवडाभर हे तापमान असेच चढते राहील असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. किमान तापमानातही वाढ झाल्याने सकाळी नऊ वाजेपासूनच अंग भाजून निघणारे ऊन जाणवत होते. आठवड्यानंतर तापमानात किंचित घट होईल, असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
यंदा फेबु्वारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा कडाका राहिला. त्यानंतर एकदमच थंडी गायब होऊन तापमानात वाढ होत गेली. दोन दिवस तर तापमानात कमालीची वाढ झाली असून साधारणत: गेल्या आठवड्यापेक्षा सरासरी ७ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे.
सकाळी सूर्याचे दर्शन दिल्यापासूनच भाजणाऱ्या सूर्य किरणांचा मारा सुरु होतो. नऊ वाजता तर अंग भाजण्यास सुरुवात होते. त्यानंतर पारा जसजसा वाढत जाईल तशी नागरिकांची घालमेल सुरू होते. दुपारी बारा वाजता तर घराबाहेर पडू वाटत नाही. दुपारी चार नंतर हळूहळू तापमान कमी होत जाते. शनिवारी दिवसभरात किमान १९, तर कमाल ३४ डिग्री तापमानाची नोंद झाली.
पुढील आठवड्यापर्यंत थंडीचे आवर्तन
पश्चिम झंझावातातून तसेच २० डिग्री अक्षवृत्तादरम्यान उत्तर भारतात १२ किलोमीटर उंचीवरील तपाम्बरच्या पातळीतील ताशी २७० ते ३०० किमी वेगाने वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळे व एकत्रित घडामोडीमुळे महाराष्ट्राला माफक थंडी अनुभवायला मिळाली. आता या आठवड्यात थंडी काहीशी कमी होऊन तापमानात वाढ होणार आहे. परंतु, पुन्हा पश्चिम हिमालयीन क्षेत्रात नवीन पश्चिमी झंझावाताच्या परिणामातून तापमानाचा पारा घसरून थंडी पडण्याची शक्यता निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
आगामी आठवड्यातील अंदाज (कमाल व किमान तापमान)
मंगळवार : ३५ (१९)
बुधवार : ३६ (१९)
गुरुवार : ३६ (१९)
शुक्रवार : ३६ (१८)
शनिवार : ३५ (१९)
रविवार : ३४ (१८)
सोमवार : ३४ (१९)