भगवान बाहुबली मूर्तीस पंचामृत अभिषेकाने सोहळ््याची सांगता
By admin | Published: May 26, 2015 01:05 AM2015-05-26T01:05:57+5:302015-05-26T01:07:39+5:30
सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक : देशभरातील श्रावकांची उपस्थिती; हत्तीवरून जैन ग्रंथांची मिरवणूक
बाहुबली : णमोकार महामंत्र व भगवान बाहुबलींचा जयजयकार करत अत्यंत धार्मिक, भक्तीमय वातावरणात भगवान बाहुबली सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता झाली. संपूर्ण महामस्तकाभिषेक सोहळ्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक उपस्थित राहिले होते. तर सोहळ्याच्या सांगता समारंभास हजारो भाविकांनी पुण्यलाभ घेतला. यावेळी दिगंबर मुनींसह अनेक त्यागीगण उपस्थित होते.
विसाव्या शतकातील प्रथम जैनाचार्य १०८ शांतीसागर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुदेव समंतभद्र महाराज यांनी १००८ भगवान बाहुबलींची २८ फूट उंचीची प्रतिमा ५० वर्षांपूर्वी स्थापन केली. त्या मूर्तीचा दर १२ वर्षांनी मस्तकाभिषेक सोहळा संपन्न होतो. यावर्षी हा सोहळा ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान विधिवत संपन्न झाला. याच सुवर्णमहोत्सवी महामस्तकाभिषेक सोहळ्याची सांगता विविध कलशाभिषेकांनी झाली.
या सांगता समारंभप्रसंगी महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी बाहुबलींचे शिक्षण क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाल्याचे सांगितले.
महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी जि. प. अध्यक्ष डी. सी. पाटील यांनी समाजबांधव, दक्षिण भारत जैन सभा, वीर सेवा दल, दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, बाहुबली संस्थचे शिक्षक, गुरुकूल स्नातक परिषदेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्यामुळेच हा महामस्तकाभिषेक सोहळा पार पडला, असे सांगून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळी हत्तीवरून जैन ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली. त्याचा मान डॉ. नेमिनाथ बाळीकाई यांना मिळाला. पंचामृत अभिषेकाचा मान प्रमोद शहा यांना मिळाला. गोमटेश बेडगे हे भक्तामर विधानाचे मानकरी ठरले. यावेळी पूज्य मुनी स्वभावसागर महाराज व सुमतिसागर महाराज यांची मंगलप्रवचने झाली.