मंदिर फलकावरून अंबाबाई नाव हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 06:15 PM2017-10-10T18:15:33+5:302017-10-10T18:20:57+5:30
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई हे नाव काढून टाकले आहे. देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबाबत आकस का आहे असा जाब मंगळवारी आई अंबाबाई भक्तांनी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना विचारला.
कोल्हापूर,10 : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई हे नाव काढून टाकले आहे. देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबाबत आकस का आहे असा जाब मंगळवारी आई अंबाबाई भक्तांनी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना विचारला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाबाई मंदिराच्या परिसरात तसेच चारही दरवाज्यांवर विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर अंबाबाई मंदिर तसेच महालक्ष्मी मंदिर असा उल्लेख आहे. मात्र देवस्थान समितीने लावलेल्या फलकांवर करवीरनिवासिनी देवस्थान असा उल्लेख करण्यात आला आहे.
अंबाबाई नावाला कधीच कोणाचीही हरकत नाही. सर्व प्रसारमाध्यमांनी देवीचा अंबाबाई असा उल्लेख केला. असे असताना देवीने नाव हटवण्यामागे शासनाच्या म्हणजेच देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबद्दल आकस का आहे असा प्रश्न पडतो.
उत्सव काळात मंदिराच्या नावलौकिकाला बाधा येवून नये व मंदिराची शांतता भंग होवू नये म्हणून या प्रकाराबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. देवस्थान समितीने याबाबत तातडीने खुलासा करावा आणि नाव पूर्वी होते तसेच अंबाबाई मंदिर करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बाबा पार्टे, सुशांत चव्हाण, अशोक पोवार, स.ना. जोशी, सुरेश साबळे, धनंजय चव्हाण, रघुनाथ गवळी, गौरव भागवत, राजेंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
करवीरनिवासिनीतून उलट संभ्रमच...
आदिशक्ती स्वरुप असलेल्या देवीचा काही ठिकाणी महालक्ष्मी तर काही ठिकाणी अंबाबाई असा उल्लेख आहे. कोल्हापुरकरांनी देवीला अंबाबाई रुपात पूजले. आजही कोल्हापुरचे लोक अंबाबाई मंदिर म्हणूनच संबोधतात. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कागदपत्रांवर करवीरनिवासनी असा उल्लेख असल्याने समितीकडून बदल करण्यात आला आहे.
करवीरनिवासिनी म्हणजे करवीरात निवास करणारी मात्र या शब्दातून हे मंदिर नेमके कोणत्या देवतेचे आहे हे समजत नाही. परस्थ भाविकांना किंवा जगभरातून येणाºया पर्यटकांना देवीचे मुळ स्वरुप कळण्याऐवजी ही नेमकी कोणती देवी असा संभ्रमच होणार आहे. त्यामुळे या शब्दाला विरोध होत आहे.