मंदिरे बंद...स्वामींची सेवा घरातूनच, समर्थ प्रकटदिन साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 06:41 PM2021-04-14T18:41:50+5:302021-04-14T18:43:51+5:30
CoronaVirus Religious programme Kolhapur : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जप, स्वामी चरित्राचे वाचन, अभिषेक, आरती अशा विविध उपक्रमांनी बुधवारी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी यानिमित्त पालखी मिरवणूक, भजन किर्तन व धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले. तर साधकांना घरीच स्वामी सेवा करण्याची विनंती करण्यात आली होती.
कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जप, स्वामी चरित्राचे वाचन, अभिषेक, आरती अशा विविध उपक्रमांनी बुधवारी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन साजरा करण्यात आला. दरवर्षी यानिमित्त पालखी मिरवणूक, भजन किर्तन व धार्मिक सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले. तर साधकांना घरीच स्वामी सेवा करण्याची विनंती करण्यात आली होती.
कोटीतीर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बाल संस्कार केंद्रात दरवर्षी मोठी गर्दी असते. यंदा सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत स्वामींच्या मूर्तीवर मंत्रोक्त अभिषेक , पूजा अर्चा करण्यात आली. सकाळी आठ वाजता भूपाळी आरती, साडे दहा वाजता वाजता नैवेद्य, आरती, प्रसाद दाखवण्यात आला.
येथे दिवसभर भाविक स्वामी चरित्राचे वाचन करत असतात, मात्र कोरोनामुळे केंद्र बंद असल्याने घरीच स्वामी सेवा करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे रोज नित्य सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांमार्फत पूजा करण्यात आली. रुईकर कॉलनीतील स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळ प्रज्ञापूरी (काटकर महाराज प्रणित) च्यावतीनेही सकाळी अभिषेक व धार्मिक विधी करण्यात आले. मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत प्रकटकांड वाचन करण्यात आले. त्यानंतर पूजा व आरती करून प्रसाद वाटप झाले. यासह संभाजीनगर येथील स्वामी समर्थ मंदिरात व विविध दत्त मंदिरात हा दिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.