Kolhapur- भाविकांच्या सुविधांसाठी शेतकरी संघाच्या इमारतीचे तात्पुरते अधिग्रहण, जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 02:06 PM2023-09-26T14:06:01+5:302023-09-26T14:06:37+5:30

लोकप्रतिनिधींशी चर्चेनंतरच निर्णय

Temporary acquisition of Farmers Union building for devotees facilities, District Collector clarified | Kolhapur- भाविकांच्या सुविधांसाठी शेतकरी संघाच्या इमारतीचे तात्पुरते अधिग्रहण, जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

Kolhapur- भाविकांच्या सुविधांसाठी शेतकरी संघाच्या इमारतीचे तात्पुरते अधिग्रहण, जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

googlenewsNext

कोल्हापूर : अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सेवासुविधा देण्यासाठी शेतकरी बझारच्या इमारतीचे गर्दीच्या कालावधीसाठी तात्पुरते अधिग्रहण करण्यात आले आहे. नियमांनुसार या काळातील रितसर भाडे संघाला दिले जाईल. स्थानिक आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतरच अधिग्रहणाचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत भवानी मंडप आवारातील शेतकरी संघाची तीन मजली इमारत ताब्यात घेण्याचे देवस्थान समितीला दिले. रविवारी इमारत ताब्यात घेऊन समितीने भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी स्वच्छतेसह विविध कामांना सुरुवात केली. मात्र, संघाने या निर्णयाला विरोधाचा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांविरोधात वातावरण तयार करून इमारत ताब्यात घेण्याला विरोध केला जात आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी सविस्तर संवाद साधत प्रशासनाची बाजू स्पष्ट केली.

ते म्हणाले, गेल्या वर्षभरापासून ही इमारत मिळावी यासाठी संघाकडे देवस्थान समितीचा पाठपुरावा सुरू आहे. संघावर प्रशासक होते त्यावेळीही देवस्थान समितीने संघ व मॅग्नेटमधील वाद संपविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्यामध्ये तडजोडीची चर्चा झाली. त्यासाठी संघाची विशेष सर्वसाधारण सभा झाली, ठराव झाला. एवढ्या घडामोडी झाल्यानंतर समितीने पुन्हा संघाला पत्रव्यवहार केला, वारंवार पाठपुरावा केला पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अधिग्रहणाची रितसर प्रक्रिया करून संघ व मॅग्नेटलाही कळविण्यात आले.

इमारत अधिग्रहित करण्याचा निर्णय स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन, सर्वांच्या एकमताने झाला आहे. हे अधिग्रहण कायमस्वरूपी नाही म्हणूनच बेसमेंटसह ग्राऊंड व स्टील फ्लोअऱ् अशा तीनही मजल्यांच्या अधिग्रहणाच्या आदेशातून बेसमेंट वगळले आहे.

अंबाबाई भक्तांसाठी वापर

ते म्हणाले, अंबाबाई भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्याचा विषय ज्या-ज्यावेळी निघाला त्या-त्यावेळी सर्वच घटकांकडून कायमच शेतकरी संघाच्या इमारतीचाच पर्याय मांडण्यात आला. संघ व मॅग्नेटमधील वादामुळे गेली कित्येक वर्षे ही इमारत विनावापर पडून आहे, उत्पन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. उलट आता ही वास्तू अंबाबाई भक्तांच्या सेवेसाठी वापरली जाणार आहे.

रिसतर भाडे देणार

गर्दी कालावधीसाठीचे हे अधिग्रहण असून नियमांनुसार याकाळातील रितसर भाडे संघाला दिले जाणार आहे. ही रक्कम करवीरनिवासिनी फंडातून दिली जाणार आहे. गेली कित्येक वर्षे इमारतीतून संघाला उत्पन्न मिळत नव्हते. आता तात्पुरत्या कालावधीसाठी का असेना उत्पन्न मिळणार आहे.


आगामी काळात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय महत्त्वाची आहे हे सर्वांनी समजून घ्यावे. शासकीय नियमाला धरून इमारतीचे अधिग्रहण झाले असून ते बेकायदेशीर नाही. हे अधिग्रहण कायमस्वरूपी नाही तर तात्पुरते आहे. त्यामुळे संघाने व नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, तथा प्रशासक. प. म. देवस्थान समिती
 

Web Title: Temporary acquisition of Farmers Union building for devotees facilities, District Collector clarified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.