सभापतींची बंडखोरी की तात्पुरती सोयरीक?
By admin | Published: December 29, 2015 11:47 PM2015-12-29T23:47:06+5:302015-12-30T00:29:33+5:30
कागलचे राजकारण : नवी समीकरणे पुढे येणार काय याची उत्सुकता
जहाँगीर शेख --कागल -विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल पंचायत समितीचे सभापती श्रीकांत उर्फ पिंटू लोहार यांनी आपल्या गटाचा आदेश डावलून सतेज उर्फ बंटी पाटील यांची बाजू उघडपणे घेतल्याने अनेकांच्या राजकीय भूवया उंचावल्या असून, तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू होती. सभापतीची ही बंडखोरी पंचायत समितीच्या राजकारणास उलथापालथ घडविणार की तात्पुरती राजकीय सोयरीक ठरणार, याचीच चर्चा आज रंगली होती.
सध्या पंचायत समितीवर माजी आमदार संजय घाटगे आणि प्रा. संजय मंडलिक गटाची सत्ता आहे. चार वर्षांपूर्वी घाटगे-मंडलिक गट एकत्रित लढून त्यांनी राजे मुश्रीफ-पाटील गटावर मात करीत ही सत्ता मिळविली आहे. संजय घाटगे गटाचे चार तर मंडलिक गटाचे तीन सदस्य आहेत, तर मुश्रीफ गटाचे दोन, राजे गटाचा एक असे विरोधी बाकावर आहे. विद्यमान सभापती पिंटू लोहार घाटगे गटाचे, तर उपसभापती भूषण पाटील मंडलिक गटाचे आहेत. मात्र हे दोन्ही पदाधिकारी तयारीचे असल्याने पदावरचे सर्व हक्क अधिकार पुरेपूर उपयोगात आणतात. फार दबाव घेत नाहीत.
यातून येथे सत्ताधारी गटातच शह काटशह सुरु असतो, मात्र हे चव्हाट्यावर येत नाही. आता विधानपरिषद निवडणुकीत सभापतींनी सुरुवातीपासून गटाच्या विरुद्ध भूमिका घेतली. इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे यांनी आणलेल्या अर्जावर बेधडक सूचक म्हणून सही केली. तर संजय घाटगेंनी आ. महाडिक यांना पाठिंबा
दिला असता. ते सतेज पाटील यांच्या बाजूला राहिले आणि समरजितसिंह राजे आणि आमदार मुश्रीफ एकत्रच
होते. तालुक्यातील मतदारही त्यांना एकत्र सहलीवर पाठविले. या घडामोडीतून पंचायत समितीच्या राजकारणात काही नवीन समीकरणे पुढे येणार काय, याची उत्सुकता तालुक्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
बंडाकडे दुर्लक्ष करण्याशिवाय गत्यंतर नाही
वर्षावर येऊन ठेपलेली पंचायत समितीची निवडणूक. त्यापूर्वी कागल -मुरगूड नगरपालिकांच्या निवडणुका यांचा विचार करता प्रा. संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे, आमदार मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्याशी फार जवळीक आणि टोकाचा विरोध अशी कोणतीच भूमिका तूर्ततरी घेणार नाहीत, अशीच चिन्हे दिसत असल्याने सभापतींचे हे बंड तात्पुरती राजकीय सोयरीक ठरण्याची शक्यता आहे. तर संजय घाटगेंनाही या बंडाकडे दुर्लक्ष करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी ही परिस्थिती आहे.