Kolhapur: सर्वसामान्यांचे आधारवड असलेल्या ‘सीपीआर’मध्ये साडे दहा हजार शस्त्रक्रिया, बहुतांशी मोफतच
By समीर देशपांडे | Published: October 28, 2023 03:47 PM2023-10-28T15:47:32+5:302023-10-28T15:47:53+5:30
अपुरे मनुष्यबळ तरीही चांगली आरोग्यसेवा
समीर देशपांडे
कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सर्वसामान्यांच्या आयुष्यात आधारवड बनून कार्यरत आहे. गेल्या साडेनऊ महिन्यात या ठिकाणी तब्बल १० हजार ४०४ मोठ्या आणि लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ज्यासाठी बाहेर खासगी रुग्णालयात अडीच, तीन लाख रुपये भरावे लागतात त्या शस्त्रक्रिया सीपीआरमध्ये मोफत केल्या जातात.
सीपीआर रुग्णालय हे ६५० खाटांचे रुग्णालय असून या ठिकाणी केवळ कोल्हापूरच नव्हे तर बेळगाव, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातूनही रुग्ण तपासणी आणि उपचारासाठी येतात. एकतर या सर्व जिल्ह्यांना ही मोठे शासकीय रुग्णालय जवळ पडते आणि या ठिकाणी बहुतांशी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच येणाऱ्या बहुतांशी रुग्णांचे कोल्हापूरमध्ये कोणी ना कोणी नातेवाईक असतात. त्यामुळे या चारही जिल्ह्यातील, सीमा भागातील रुग्ण सीपीआरला प्राधान्य देतात.
या ठिकाणी जरी मनुष्यबळ कमी असले तरीही डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आणि मुख्यत्वे करून खर्च कमी येतो आणि काही शस्त्रक्रिया या मोफतच केल्या जातात. केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारकांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. किरकोळ शस्त्रक्रिया तर २५० आणि ५०० रुपयांच्या शासकीय शुल्कानुसार केल्या जातात तर हृदयशस्त्रक्रियांसाठी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. जो बाहेर अडीच लाखापर्यंत येतो. दारिद्र्यरेषेखालील नागरिक, एडसग्रस्त अशांवरही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात.
शस्त्रक्रिया प्रकार १ जानेवारी ते २० ऑक्टोबर २३ पर्यंत झालेल्या शस्त्रक्रिया
- महिलांच्या शस्त्रक्रिया : २,५२४
- काचबिंदू, मोतीबिंदू, डोळ्यात गेलेल्या वस्तू काढणे : १९७३
- हार्निया, अपेंडिक्स, अल्सर, पित्ताशय, आतड्यांच्या शस्त्रक्रिया : १८८१
- थॉयराईड, कानाचा पडदा फाटणे, नाकाचे हाड वाढणे, टॉन्सिल काढणे : १८४१
- हृदयशस्त्रक्रिया : १,१४४
- अपघातानंतरचे, फॅक्चर शस्त्रक्रिया : ७४६
- अपघातानंतरच्या शस्त्रक्रिया : १४५
अपुरे मनुष्यबळ
सीपीआरमध्ये सुमारे ४०० जागा रिक्त आहेत. यामध्ये ३५ डॉक्टरांचाही समावेश आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मोठी गरज येथे भासत असताना सुमारे २०० जागा रिक्त आहेत. अशातही सीपीआरचे डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी वृंद आपल्या बंधूभगिनींनी चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी कार्यरत आहेत.
सीपीआरमध्ये अपुरे मनुष्यबळ असतानाही सर्व घटक अधिक काम करत रुग्णांना शक्य ती सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नागरिक सीपीआरमध्ये येतात. हेच सीपीआरवरील विश्वासाचे प्रतीक आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - डॉ. प्रकाश गुरव, अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर