सरवडेच्या दिगंत पाटील याला दहा लाखांचे बक्षीस, इंग्रजी चित्रपटासाठी लिहिली कथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:54 PM2020-05-12T12:54:14+5:302020-05-12T12:56:26+5:30
सरवडे (ता. राधानगरी) येथील दिगंत संभाजी पाटील याने राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी चित्रपट कथालेखन स्पर्धेसाठी लिहिलेल्या गिल्ट या संहितेला सिनेस्तान स्टोरीटेलर्स स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले.
दत्ता लोकरे
सरवडे : सरवडे (ता. राधानगरी) येथील दिगंत संभाजी पाटील याने राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी चित्रपट कथालेखन स्पर्धेसाठी लिहिलेल्या गिल्ट या संहितेला सिनेस्तान स्टोरीटेलर्स स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले.
दिगंतने गिल्ट या नावांने पटकथा लिहिली असून त्याचा भविष्यात इंग्रजी चित्रपट येऊ शकतो. सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतून दिगंतचे वडील संभाजीराव पाटील हे प्रोफेसर म्हणून निवृत्त झाले आहेत. आई प्रज्ञा पाटील या आता प्रोफेसर आहेत. दिगंत सध्या व्यावसायिक पटकथा लेखक म्हणूनच काम करत आहे.
या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातून साडेतीन हजार स्क्रिप्ट आल्या होत्या. त्यातून ह्यगिल्टह्णला दुसरा क्रमांक मिळाला. अमेरिकास्थित शेजल या मुलीस पहिले २५ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. स्पर्धेचा निकाल दोन दिवसांपूर्वी सीएनएन या वाहिनीवरून घोषित करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण अभिनेता अमिर खान, जुही चतुर्वेदी, राजकुमार हिराणी, अंजुम राजाबली अशा मान्यवर कलाकारांनी केले. सिनेस्तान इंडिया संस्थेतर्फे ही स्पर्धा गेल्यावर्षीपासून घेतली जात आहे. त्या कंपनीनेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या पटकथांवर चित्रपट यावेत यासाठी निर्मात्यांबरोबर बक्षीस विजेत्यांचा संपर्क करून दिला आहे.
दिगंत हा सध्या टी.व्ही ९ वर गाजत असलेली ह्यप्रेमाचा गेम सेम टू सेमह्ण या मालिकेचे संवाद लेखन करत आहे. एक इंग्रजी कादंबरी लिहिली आहे. ती प्रकाशनच्या वाटेवर आहे. ऑल इंडियन कुस्ती चॅम्पियनशिप विजेते व सुप्रसिद्ध गायक संगीतकार प्रा. संभाजी पाटील वडिलांकडून घरातच तबलावादनाचे धडे घेतले.
सुरांच्या वातावरणासोबत घरातील समृद्ध ग्रंथालयामुळे लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली त्याचा फायदा आता होतो आहे, असे दिगंतने सांगितले. प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटीने भौतिकशास्त्रमध्ये एम.एस्सी करून आयआयटी मुंबई येथे २ वर्ष संशोधन केले. सध्या तबल्यासोबत लेखन करण्यावर लक्ष केंद्रित करून पटकथा लेखन सुरू आहे.
गिल्ट म्हणजे अपराधीपणा..माझ्या पटकथेचा मध्यवर्ती विषयही तोच आहे. एक आत्महत्या होते व ती आत्महत्या का झाली म्हणून सगळे कसे अपराधीपणाचे भाव घेऊन जगतात असा विषय गुंफला आहे.
- दिगंत पाटील