सातारा जिल्ह्यातील मौजे शिवडेत दहा लाखाचा मद्यसाठा जप्त
By admin | Published: June 7, 2017 03:55 PM2017-06-07T15:55:33+5:302017-06-07T16:05:56+5:30
आरोपीस अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0७ : सातारा जिल्ह्यातील मौजे शिवडे (ता. कऱ्हाड) येथे बंद खोलीत ठेवलेला दहा लाख किंमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री जप्त केला. याप्रकरणी संशयित गौरव कैलास अर्जूगडे (वय २५, रा. हनुमानवाडी, ता. कऱ्हाड) याला अटक केली. संशयिताने इतक्या मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला कोठून, तो विक्री कोणाला करणार होता. यासंबधीची चौकशी सुरु असल्याची माहिती निरीक्षक युवराज शिंदे यांनी बुधवारी दिली.
अधिक माहिती अशी, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी महामार्गांलगत ५०० मीटर अंतरापर्यंतची असणारी सर्व मद्यालये बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा फटका कऱ्हाडमधील उंब्रज येथील वाईन शॉप सोडले तर सर्वच मद्यालयांना बसला. १ एप्रिलपासून ही मद्यालये बंद आहेत.
कारवाई झालेल्या वाईन शॉप, परमीट रूम, बीअर शॉपी, देशी दारू दुकानातून चोरटी मद्य विक्री केली जात होती. तसेच गौरव अर्जूनगडे याने एका बंद खोलीत देशी-विदेशी मद्याचा साठा ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांना मिळाली. त्यांनी निरीक्षक शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी रात्री भरारी पथकातील एम. एम. परळे, एम. एस. पाटील जवाण सुशांत बनसोडे, कृष्णात पाटील, सुहास वरुटे, सुखदेव सिद, अमित तांबट यांनी शिवडे गावच्या हद्दीत जी. एस. नर्सरी कैलास पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या बंदी खोलीवर छापा टाकला.
यावेळी अवैधरित्या विक्रीसाठी वाहतूक करुन आणलेला देशी मद्याचे ९९६० बाटल्या, देशी मद्याचे २७३६ बाटल्या, बिअरच्या १५६ बाटल्या असा सुमारे दहा लाख किंमतीचा मद्यसाठा मिळून आला. घटनास्थळीच पंचनामा करुन मद्यसाठा जप्त करुन ट्रकाने कोल्हापूरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवला. या मद्यसाठ्याचा मालक गौरव अर्जूगडे याला अटक केली. त्याचेकडे चौकशी केली असता तो दिशाभूल करीत आहे. त्याच्या चुलत्याचे वाईन शॉप होते. ते पाचशे मिटर अंतराच्या नियमात बंद झाले आहे. बाहेरुन चोरुन मद्यासाठा आणून किरकोळ मद्यविक्रेत्यांना विक्री करण्याचा त्याचा प्लॅन होता असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. मद्यसाठा आनण्यासाठी वापरलेले वाहन जप्त केले जाणार असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
कोल्हापूर-कऱ्हाड कनेकशची शक्यता
कऱ्हाडमध्ये एकमेव उंब्रज येथे वाईन शॉप आहे. या दुकानाचा मालक शंकर मूलचंदाणी हा कोल्हापुरात राहतो. त्याचेकडून मद्यसाठा घेतला की त्याला विक्री करणार होते. यासंबधी त्याला कार्यालयात बोलवून दिवसभर चौकशी केली. मूलचंदाणी हा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. नागाळा पार्कात त्याचे कार्यालय आहे. कराडो रुपये किंमतीच्या गाड्यांची विक्री-खरेदीचे व्यवहार त्याचेकडून होत असतात. त्याचे अवैध मद्यसाठ्यासंबधी कोल्हापूर-कऱ्हाड कनेकशन आहे का, यासंबधी पोलीस चौकीशी करीत आहेत.मोबाईल कॉल डिटेल्सही तपासले जाणार आहेत, असे पोलीसांनी सांगितले.
ताडी जप्त
शनिवार पेठ कराड व शेणोली (ता. कऱ्हाड) येथील अवैध ताडी विक्री करणाऱ्या केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी टाकून १३५ लिटर ताडी जप्त केली. याप्रकरणी नंदकुमार प्रकाश कडव (वय ३२, रा. आगाशिवनगर-मलकापूर, ता. कऱ्हाड) बानू कृष्णा बड्यावार (२२, रा. शेणोली, ता. कऱ्हाड) यांना अटक केली.