कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदारांसह दहाही आमदार भाजपचेच : चंद्रकांतदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:36 AM2017-11-06T11:36:26+5:302017-11-06T11:51:54+5:30

लोकसभेला सरकार बनवलं, विधानसभा जिंकली. काँग्रेसवाले म्हणाले आता नगरपालिकेला सोडत नाही तर राज्यातील ७० टक्के नगरपरिषदा जिंकल्या, मग जिल्हा परिषदा जिंकल्या, आता ग्रामपंचायतींही ताब्यात घेतल्या. आता २०१९ मध्ये दोन खासदार आणि आठ आमदार भाजपचे आणि दोन आमदार आम्ही ठरवू तेच जिंकणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.

Ten MLAs, including two MPs in Kolhapur district, are from BJP: Chandrakant Dada | कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदारांसह दहाही आमदार भाजपचेच : चंद्रकांतदादा

भाजपच्यावतीने नूतन सरपंच आणि सदस्यांचा सत्कार महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

Next
ठळक मुद्देचंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच-सदस्यांचा सत्कारचंद्रकांतदादा पाटील यांनी दिले विरोधकांना आव्हान जे उपक्रम राबवाल त्यासाठी सरकार आणि गरज लागेल तिथे चंद्रकांत पाटील मदत करेल

कोल्हापूर : लोकसभेला सरकार बनवलं, विधानसभा जिंकली. काँग्रेसवाले म्हणाले आता नगरपालिकेला सोडत नाही तर राज्यातील ७० टक्के नगरपरिषदा जिंकल्या, मग जिल्हा परिषदा जिंकल्या, आता ग्रामपंचायतींही ताब्यात घेतल्या. आता म्हणतील २०१९ मध्ये बघूया. चला, आम्ही तयार आहोत. दोन खासदार आणि आठ आमदार भाजपचे आणि दोन आमदार आम्ही ठरवू तेच जिंकणार हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही, अशा स्पष्ट शब्दांत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.


भाजपच्यावतीने नूतन सरपंच आणि सदस्यांचा सत्कार महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नेते, कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीत भाजपने ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील हे यश सर्वांना स्नेहभोजन देऊन साजरे केले. यावेळी १२८ सरपंच आणि ११०० सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिवसेनेने गेल्याच आठवड्यात ‘सहा’चे, ‘दहा’ आमदार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. शिवसेनेचे नाव न घेता पाटील यांनी हा टोला लगावला.

पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसची जहाँगिरी मानली जायची. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात १२८ सरपंच भाजपचे झाले. सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला तेथे भाजपचे ७२ सरपंच झाले, सांगलीत तर तीन-तीन मंत्री असायचे, तिथेही १०० सरपंच भाजपचे झाले.

तुम्ही राहता त्या गावातील गरिबी कधीपर्यंत संपेल, असा प्रश्न नरेंद्र मोदी यांना मला विचारला होता. तोच प्रश्न घेऊन माझ्या भुदरगड तालुक्यातील खानापूर गावातील आणि कोल्हापूर शहरातील गरिबी दूर करण्यासाठी मी रात्रं-दिवस काम करतो.

ईश्वराची प्रार्थना करतानाही मी याचे स्मरण करतो. तुम्हीही आजपासून आपले गाव गरिबीमुक्त करण्याचा संकल्प करा. जखमी कुत्र्यांपासून ते आजारी असलेल्या माणसांपर्यंत सर्वांसाठी माझे काम सुरू असते असे पाटील यांनी सांगितले.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, सन १९६० पासून कोल्हापूरला जी मंत्रिपदे मिळाली त्याचा आढावा घेतला तर मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो की त्यांनी चंद्रकांतदादांच्या रूपाने कोल्हापूरला पहिल्यांदा महसूल आणि सार्वजनिक बांधकाम, सहकार ही महत्त्वाची खाती दिली.

संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून खासदार तर समरजितसिंह घाटगे यांना पुणे म्हाडाचे अध्यक्ष केले. फडणवीस यांनी कोल्हापूरचा सन्मान केला. दुसरीकडे ४० वर्षे थांबलेला विकास आराखडा दादांनी मंजूर करून घेतला. १ हजार कोटींपेक्षा अधिक निधी आणला.


‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, पदाधिकाºयांनी सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये मिसळून काम करण्याची गरज आहे. तुमच्या सहकार्यासाठी आमची कार्यालये खुली राहतील. भाजपचे राज्य चिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके,राहुल देसाई यांचीही भाषण झाले. संघटनमंत्री बाबा देसाई यांनी सूत्रसंचालन केले.


कार्यक्रमाला आजरा साखर कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी, गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर, दौलत कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेता अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने, अनिल यादव, आजरा अर्बन बँकेचे चेअरमन विलास नाईक, अण्णा भाऊ सूतगिरणीचे व्हा. चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शौमिका महाडिकांनी मांडला पक्षातंर्गत मतभेदाचा मुद्दा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पक्षांतर्गत मतभेदाचा मुद्दा मांडला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत मतभेद सुरू झाले आणि पार्टी संपली. आपल्यातही असं काही होतं का हे पाहायला हवे. पक्षाचेच पदाधिकारी विरोधकांच्या स्टेजवर जावून भाषणे कशी करतात, अशी विचारणा महाडिक यांनी केली. शिरोली येथे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्याने महाडिकांविरोधात भूमिका घेतली होती; याचा याला संदर्भ होता.

अंधार संपवण्यासाठी दिव्याची भेट

मंत्री पाटील म्हणाले, आज तुम्हा सर्वांना एक दिवा भेट म्हणून देण्यात आला आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी हा दिवा भेट म्हणून दिला आहे. याची नेहमी जाणीव ठेवून काम करा.

केलेली मदत लोकांच्या घरी जाऊ दे

तुम्हाला दहा लाखांचा निधी दिला पाहिजे तो तुमचा अधिकारच आहे. मात्र, यासाठी जे काही उपक्रम तुम्ही राबवाल त्यासाठी सरकार आणि गरज लागेल तिथे चंद्रकांत पाटील मदत करेल. मात्र, ती मदत लोकांच्या घरी जावू दे. तुमच्या घरात जाता कामा नये. खिशाला चाट लावून लोकांचे काम करण्याची वृत्ती ठेवा, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
 

 

Web Title: Ten MLAs, including two MPs in Kolhapur district, are from BJP: Chandrakant Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.