कोल्हापूर जिल्ह्यात दहा नवे कोरोना रुग्ण, एकूण रुग्णंसख्या पोहोचली ६० वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:59 PM2023-03-31T12:59:46+5:302023-03-31T13:00:04+5:30
सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन यामुळे अनेकदा सर्दी आणि खोकल्याचा मोठा त्रास
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत नव्याने १० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकूण सक्रिय रुग्णंसख्या ६० वर पोहोचली आहे. यातील १७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या महिन्यापासून हळूहळू कोरोनाची पुन्हा लागण सुरू झाली असून दिवसेंदिवस ही संख्या वाढत निघाली आहे. गेल्या पंधरवड्यात तिघा कोरोनाग्रस्तांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या २४ तासांत नव्याने दहा जणांना लागण झाली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील पाच, करवीर तालुक्यातील तिघांचा आणि भुदरगड, हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
एकीकडे स्वाइन फ्लूची लागणही नागरिकांना होत असून खोकल्याचा अनेकांना त्रास सुरू झाला आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन यामुळे अनेकदा सर्दी आणि खोकल्याचा मोठा त्रास सुरू असून आठवडाभर झाला तरी खोकला कमी येत नाही, अशी स्थिती आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा मास्क लावण्याची गरज व्यक्त होत आहे.