Mucormycosis In Kolhapur : म्युकरमायकोसिसचे संशयित दहा रुग्ण सीपीआरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 10:48 AM2021-05-20T10:48:21+5:302021-05-20T10:53:12+5:30
Mucormycosis In Kolhapur : म्युकरमायकोसिसच्या संशयितांची संख्या सध्या वाढत असून एका सीपीआरमध्ये दहा रुग्ण उपचार घेत आहेत. यातील पाच जण नव्याने बुधवारी दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठीही बेड वाढवण्याची वेळ आरोग्य विभागावर येणार आहे.
कोल्हापूर : म्युकरमायकोसिसच्या संशयितांची संख्या सध्या वाढत असून एका सीपीआरमध्ये दहा रुग्ण उपचार घेत आहेत. यातील पाच जण नव्याने बुधवारी दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठीही बेड वाढवण्याची वेळ आरोग्य विभागावर येणार आहे.
नाकाच्या पाठीमागच्या बाजूस काळी बुरशी तयार होऊन ती मेंदूपर्यंत जाते. डोळ्यांपासून, दातांपर्यंतच्या अवयवांवर देखील याचा परिणाम होतो. कोल्हापूर जिल्ह्यात या आधीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याची दखल घेऊन मंगळवारपासून सीपीआरमध्ये दहा रुग्णांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी पाच, संध्याकाळी दोन आणि बुधवारी नवे पाच अशा दहा रुग्णांनी हा स्वतंत्र विभाग भरला आहे. त्यामुळे आणखी बेड वाढवावे लागणार आहेत.
हे सर्व संशयित रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील असून यामध्ये ९ पुरुष आणि महिलेचा समावेश आहे. या सर्व संशयितांच्या बायोप्सी तपासणीसाठी शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठवल्या असून त्याचा अहवाल गुरुवारी संध्याकाळपर्यंत येणार आहे. तोपर्यंत या रुग्णांच्या आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्याचे काम हाती घेणार असल्याचे राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी सांगितले.