चंदुरात दहा सुपरस्प्रेडर पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:25 AM2021-05-27T04:25:21+5:302021-05-27T04:25:21+5:30
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ३१० सुपरस्प्रेडर नागरिकांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये दहाजण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे खळबळ ...
इचलकरंजी : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ३१० सुपरस्प्रेडर नागरिकांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये दहाजण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. गावामध्ये समूह संसर्गाची शक्यता धरून ग्रामपंचायत, ग्राम समिती व आरोग्य विभाग यांच्यामार्फत संबंधितांना उपचारासाठी दाखल करणे, तसेच त्यांचे संपर्क शोधणे, औषध फवारणी व उपाययोजना करणे, या बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
चंदूर येथील मेडिकल, किराणा दुकानदार, पान शॉप, भाजीविक्रेते, अशा ३१० सुपरस्प्रेडर नागरिकांची कोविड आरटीपीसीआर तपासणी व दोघांची अॅँटिजन तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवार व बुधवारी या दोन दिवसांत प्राप्त झाला. त्यामध्ये कापड दुकानदार महिला, किराणा दुकानदार, हॉटेलचालक, पतसंस्था कर्मचारी, भाजीविक्रेता, दूध डेअरी कर्मचारी, शाहूनगर परिसरातील तीन मासेविक्रेते आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य तपासणीतील बुधवारी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. असे एकूण आजतागायत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११५ वर पोहोचली आहे. त्यातील आजपर्यंत एकूण सातजणांचा मृत्यू झाला आहे, तर ७४ जण बरे झाले आहेत.
गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या शिबिरासाठी पं. स. सदस्य महेश पाटील, सरपंच अनिता माने, प्राथमिक आरोग्य केंद्र, पट्टणकोडोलीचे वैद्यकीय अधिकारी डी. एस. बोरगावे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. समीना हिरोली, वैज्ञानिक अधिकारी रेश्मा शिकलगार, आर. ए. तराळ, आरोग्य सेवक संजय पाटील, आरोग्यसेविका दीपाली कुंभार, तलाठी सीमा धोत्रे, पोलीसपाटील राहुल वाघमोडे, डाटा ऑपरेटर यशवंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच उपकेंद्र, चंदूर येथील सर्व आशा सेविकांचे सहकार्य लाभले.