पानसरे हत्याप्रकरणी दहा संशयितांवर दोषनिश्चिती; पुढील सुनावणी २३ जानेवारीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:29 AM2023-01-10T07:29:35+5:302023-01-10T13:23:34+5:30
खटल्याच्या सुनावणीला गती
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी कोल्हापुरात जिल्हा न्यायाधीश (तिसरे) एस. एस. तांबे यांच्यासमोर सोमवारी दहा संशयितांवर दोषनिश्चिती करण्यात आली. यात समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे. दोषनिश्चिती झाल्यामुळे पानसरे हत्या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून, पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.
पुढील सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे, पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. संशयितांवर दोषनिश्चिती झाल्यामुळे खटल्याच्या कामकाजाला गती येईल, असा विश्वासही ॲड. राणे यांनी व्यक्त केला. अटकेतील दहा संशयितांपैकी सहा संशयित बंगळुरू येथील कारागृहात होते, तर तीन संशयित पुण्यातील येरवडा कारागृहात होते. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. समीर गायकवाड याला यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.
दहा संशयित हजर
समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (३७, रा. संभाजी गल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (२५, रा. दौलताबाद, औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते. वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.
१२ संशयितांवर दाखल होता गुन्हा
गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर एसआयटीने तपास करून १२ संशयितांवर गुन्हा दाखल केला. एसआयटीच्या तपासानंतर हा गुन्हा एटीएसकडे वर्ग करण्यात आला असून, एटीएसकडूनही तपास सुरू आहे. न्यायाधीश तांबे यांनी सर्व संशयितांना आरोपांबद्दल विचारणा केली. मात्र, सर्व संशयितांनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले.
दहा संशयित हजर
समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली), वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (४८, रा. पनवेल मुंबई), अमोल रवींद्र काळे (३४, रा. पिंपरी, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. जळगाव), भरत जयवंत कुरणे (३७, रा. संभाजी गल्ली, बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. कळणे, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (२५, रा. दौलताबाद, औरंगाबाद), सचिन प्रकाश आंदुरे (३२, रा. राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (२९, हुबळी धारवाड), गणेश दशरथ मिस्कीन (३०, रा. चैतन्यनगर, धारवाड) हे संशयित न्यायालयात हजर होते. वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांची कळंबा कारागृहात रवानगी करण्यात आली.
आरोप नाकबूल
न्यायाधीशांनी आरोपांबद्दल विचारणा करताच सर्व संशयितांनी आरोप नाकबूल केला. सुनावणीच्या सुरुवातीला संशयितांचे वकील समीर पटवर्धन उपस्थित नव्हते. त्यामुळे काही संशयितांनी वकिलांशी चर्चा करून दोषनिश्चितीच्या कागदांवर सही करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी न्यायाधीशांकडे केली. २० मिनिटांनी ॲड. पटवर्धन आल्यानंतर त्यांच्याशी संशयितांची चर्चा झाली. त्यानंतर संशयितांनी दोषनिश्चितीच्या कागदावर सह्या केल्या.