‘दुय्यम निरीक्षक’ साठी १० हजार जणांनी दिली परीक्षा
By admin | Published: May 28, 2017 05:44 PM2017-05-28T17:44:05+5:302017-05-28T17:44:05+5:30
शहरात ३४ केंद्रे; उमेदवारांची गर्दी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २८ : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकपदासाठी राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी परीक्षा घेण्यात आली. यात कोल्हापूर शहरातील विविध ३७ केंद्रांवरुन १० हजार ३२४ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर २४१८ जण गैरहजर राहिले.
शहरातील स. म. लोहिया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, न्यू कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी महाविद्यालय, प्रायव्हेट हायस्कूल, महावीर महाविद्यालय, न्यू इंग्लिश मेडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज आदी ३७ परीक्षा केंद्रे होती. या केंद्रावरुन १२ हजार ७४२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी १० हजार ३२४ उमेदवारांनी परीक्षा दिली.
सकाळी ११ ते दुपारी १२ अशी परीक्षेची वेळ होती. शंभर गुणांसाठी चालू घडामोडी, गणित, बुद्धीमता, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आदी विषयांवरील शंभर प्रश्न विचारण्यात आले होते. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे प्रश्नांचे स्वरुप होते. या परीक्षेच्या कामकाजासाठी जिल्ह्यातील १२०० कर्मचारी कार्यन्वित होते. दरम्यान, सुटी असून देखील या परीक्षेचे केंद्रे असलेल्या महाविद्यालय, शाळा उमेदवार आणि त्यांच्यासमवेत आलेल्या पालकांच्या गर्दीने फुलले होते.