रुग्णालयास दहा हजार रुपये दंड, बायोमेडिकल वेस्ट कोंडाळ्यात टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 04:36 PM2020-03-21T16:36:58+5:302020-03-21T16:39:41+5:30
शाहूपुरीतील सार्वजनिक कोंडाळ्यालगत जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्याप्रकरणी श्रद्धा हॉस्पिटल प्रशासनास महानगरपालिका आरोग्य विभागाने दहा हजार रुपयांचा दंड केला.
कोल्हापूर : शाहूपुरीतील सार्वजनिक कोंडाळ्यालगत जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्याप्रकरणी श्रद्धा हॉस्पिटल प्रशासनास महानगरपालिका आरोग्य विभागाने दहा हजार रुपयांचा दंड केला.
शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील एका कोंडाळ्याशेजारी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने इंजेक्शनच्या सुया, औषधे असा जैव वैद्यकीय कचरा टाकला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने त्याचा पंचनामा केला. तेव्हा त्या ठिकाणी श्रद्धा हॉस्पिटलच्या पावत्या सापडल्या. त्यानुसार चौकशी केली असता ही बाब स्पष्ट झाली. म्हणून या हॉस्पिटल प्रशासनास दहा हजार रुपये दंड करण्यात आला.
सध्या सगळीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता सामूहिक प्रयत्न होत असताना एका रुग्णालयाने अशा कठीण परिस्थितीत जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला होता. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने महापालिका आरोग्य विभागाने त्याची गांभीर्याने दखल घेतली.