ऊस उत्पादनात एकरी दहा टनांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:31 AM2018-11-20T00:31:23+5:302018-11-20T00:31:29+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, तरी उसाच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकरी दहा टनांचे उत्पादन कमी झाले असून, राज्याच्या उत्पादनातही यंदा ५० लाख टनांची घट होईल, असे चित्र आहे.
उसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाल्याने यंदा उसाचे क्षेत्र सगळीकडेच वाढले होते. त्यामुळे यंदा राज्यात उसाचे जास्त पीक होऊन अतिरिक्त साखर होईल, असाच तज्ज्ञांचा अंदाज होता; पण जून ते आॅगस्ट या कालावधीत झालेल्या एकसारख्या पावसाने उसाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात पावसाने एकदमच दडी मारल्याने पाण्याअभावी ऊस करपू लागले आणि किडीला पोषक असेच वातावरण राहिल्याने करप्याने ऊस खाली बसविला. परिणामी उत्पादन घटणार हे निश्चित होते; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यात घट होईल, याचा अंदाज नव्हता.
ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन १0 दिवस झाले. सगळ्याच कारखान्यांची तोडणी यंत्रणा गतिमान झाली असून, सुरुवातीला आडसाल लावणीची तोड प्राधान्याने सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास आडसाल लावणीच्या उसाला सरासरी एकरी ६० टनांचा उतारा पडणे अपेक्षित आहे; मात्र यंदा त्यामध्ये १0 टनांची घट झाल्याचे चित्र आहे. सध्या एकरी ४५ ते ५० टनांपर्यंतच उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदारांची चिंता वाढली
आहे. गेल्यावर्षी राज्यात सुमारे ९४० लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विभागात थोडा फटका बसेल; पण उर्वरित राज्यात दुष्काळाचा मोठा फटका बसणार आहे; त्यामुळे राज्याचे एकूण उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत किमान ५० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज आहे.
आतापर्यंत राज्यातील १३० हून अधिक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यांचे १६ नोव्हेंबरपर्यंत ८२ लाख ४० हजार टन गाळप होऊन ७४ लाख ९६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१० टक्के आहे.
गाळप व उताºयात ‘पुणे’ पुढे
राज्याच्या एकूण गाळपाचे चित्र पाहिले, तर पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. या विभागातील ४९ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ४२.९३ लाख टनांचे गाळप करीत ९.२८ टक्के साखर उतारा राखला आहे.