पुणे, रायगडकडून दहा टन ऑक्सिजन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:24 AM2021-05-08T04:24:45+5:302021-05-08T04:24:45+5:30
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने कोल्हापूरला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबविल्यानंतर पुणे व रायगड जिल्ह्यांमधून वाढीव १० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात ...
कोल्हापूर : कर्नाटक सरकारने कोल्हापूरला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबविल्यानंतर पुणे व रायगड जिल्ह्यांमधून वाढीव १० टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूर ऑक्सिजनकडील पुरवठ्यातही १० टनाने वाढ करण्यात आली आहे. यामुळे तुटवडा निर्माण झालेल्या २० टन ऑक्सिजनची गरज पूर्ण झाली असली तरी, वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच रोज ऑक्सिजनची मागणीदेखील वाढत असल्याने ती पूर्ण करणे हेच जिल्हा प्रशासनासमोरील मोठे आव्हान असून त्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत सध्या रोज १६०० च्या वर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या येत आहे. या लाटेने उच्चांक गाठायला सुरुवात केल्याने ऑक्सिजनची मागणीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या जिल्ह्यातून ३५ ते ४० टन इतक्या ऑक्सिजनची मागणी आहे. त्यापैकी २५ टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटकातील बेल्लारी येथून केला जात होता. त्यामुळे जिल्ह्याची गरज भागत होती. मात्र गुुरुवारपासून कर्नाटकने पश्चिम महाराष्ट्रासाठीचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने जिल्हा प्रशासनावर मोठा ताण आला. ही २५ टन ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून जिवाचे रान केले जात आहे.
जिल्ह्याला यापूर्वीदेखील म्हाळुंगे (जिल्हा पुणे) व डोलवी (जिल्हा रायगड) येथून १० ते १५ टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. आता त्यात १० टनाने वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर ऑक्सिजनकडून यापूर्वी ८ टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जायचा. त्यातही १० टनाने वाढ करण्यात आली आहे. अशारितीने २० टनाची गरज भागविण्यात आली आहे.
पुणे व रायगड येथील ऑक्सिजन टँकर कोल्हापुरात यायला वेळ लागणार आहे. तेथून वेळेत व योग्यरितीने पुरवठा होण्यासाठी बऱ्याच जोडण्या लावाव्या लागत असून तो सुरळीत होईपर्यंत व रोजची वाढती मागणी पूर्ण करेपर्यंत जिल्हा प्रशासनाची मात्र कसरत होत आहे.
---
आठ दिवसात मागणी दुप्पट
यापूर्वी कोल्हापुरातूून केवळ २८ टन ऑक्सिजनची मागणी होती. मात्र १८ एप्रिलपासून त्यात वाढ होऊन आता त्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता, ही गरज आणखी वाढत जाणार आहे. ही मागणी पूर्ण कशी करता येईल, याची प्रशासनाला चिंता आहे. कोल्हापुरातील प्रकल्प कार्यान्वित व्हायला जून उजाडणार आहे. तोपर्यंत ऑक्सिजनची गरज भागवणे हे मोठे आव्हान आहे.
---
अधिकाऱ्यांची टीम कार्यरत
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रेमडेसिविर, बेड, लसीकरण, कोविड केंद्र अशा प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याकडे ते स्वत: जातीने लक्ष देत आहेत. ते स्वत: शुक्रवारी दिवसभर कोल्हापूर ऑक्सिजन येथे थांबून पुरवठ्याचे नियोजन करत होते. त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके हे अधिकारीदेखील या कामात गुंतले आहेत.
--
कर्नाटकने ऑक्सिजनचा पुरवठा थांबविल्यानंतर पुणे व रायगड येथून तसेच कोल्हापूर ऑक्सिजनकडील पुरवठा वाढविण्यात आला आहे. या अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या टँकरची जोडणी होऊन पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागतोय. येत्या काही दिवसात वाढणारी मागणी कशी पूर्ण करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- किशोर पवार
अप्पर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
--