गॅस सिलिंडरची चिंता मिटणार, कोल्हापूर शहरातील 'हे' दहा प्रभाग जूनपर्यंत होणार सिलिंडरमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:47 AM2022-02-10T11:47:52+5:302022-02-10T11:48:43+5:30
आतापर्यंत ४२ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण
संतोष मिठारी
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस नेटवर्क) गॅस वितरण प्रकल्पामध्ये कोल्हापूर शहराचा समावेश झाला आहे. याअंतर्गत शहरातील पहिल्या टप्प्यात ७० किलोमीटर गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार असून, त्यातील ६० टक्के म्हणजेच ४२ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, त्यामुळे कदमवाडी, भोसलेवाडीसह दहा प्रभाग सिलिंडरमुक्त होणार आहेत.
दाभोळ ते बंगळुरू दरम्यान पाईपलाईनद्वारे औद्योगिक वापरासाठी गॅस वितरित करण्याचा हा मुख्य प्रकल्प आहे. त्याअंतर्गत १४१४ किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू झाले. कोल्हापूर शेजारून ही पाईपलाईन जाणार असल्याने त्याचा शहराला उपयोग करून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर केंद्र सरकारकडून या पाईपलाईनला सबलाईन जोडण्याचा निर्णय झाला.
या सबलाईनने हेरले येथून गॅस शहरामध्ये आणून तो पाईपलाईनद्वारे घरांमध्ये पुरवठा केला जाणार आहे. शहरातील पहिल्या टप्प्यातील ७० किलोमीटर पाईपलाईनचे काम गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सुरू झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि पाऊस, महापुरामुळे दोन ते अडीच महिने काम थांबले. सध्या काम पूर्ववत सुरू झाले असून आतापर्यंत ४२ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित २८ किलोमीटरचे काम जूनपर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने काम सुरू आहे. या पहिल्या टप्प्यात भोसलेवाडी, कदमवाडी, शाहू कॉलेज, शिवाजी पार्क, सदर बाजार, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड, रुईकर कॉलनी, आदी प्रभागांचा समावेश आहे.
दुसरा टप्पा १२० किलोमीटरचा
पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेअंतर्गत कोल्हापूर शहर सिलिंडरमुक्त केले जाणार आहे. त्यातील पाईपलाईनचा दुसरा टप्पा १२० किलोमीटरचा असून, त्यासाठी खोदाई कामासाठी परवानगीचा प्रस्ताव महानगरपालिकेला देण्यात आला आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर सिलिंडरपेक्षा कमी दरात थेट घरात गॅस उपलब्ध होणार आहे.
पहिल्या टप्प्यात कदमवाडी, भोसलेवाडी, मुक्तसैनिक वसाहत, शिवाजी पार्क, आदी दहा प्रभागांमध्ये गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. ते जूनपर्यंत पूर्ण झाल्यास हे प्रभाग सिलिंडरमुक्त होतील. पूर्ण शहरात गॅस पाईपलाईन होणे आवश्यक आहे. -सत्यजित कदम, माजी नगरसेवक
पाईपलाईनने गॅस वितरित करण्याचा प्रकल्प चांगला आहे. मात्र, ती टाकण्यासाठी खोदाईमध्ये रस्ते, पाण्याच्या पाईपलाईनची जी मोडतोड होत आहे, त्याची वेळेवर दुरुस्ती होत नाही. त्याचा त्रास मुक्तसैनिक वसाहत, रुईकर कॉलनी, सदर बाजार, आदी प्रभागांतील नागरिकांना होत आहे. महापालिका प्रशासनाने या पाईपलाईनच्या कामाकडे लक्ष देऊन रस्ते, पाण्याच्या पाईपलाईनची त्वरित दुरुस्ती करावी. -राजसिंह शेळके, माजी नगरसेवक