मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:55 PM2019-09-28T12:55:38+5:302019-09-28T12:56:41+5:30
शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत शंकर जगताप (वय २६, रा. शेंदुरजणे, ता. वाई) याला जिल्हा न्यायाधीश-२ एन. एल. मोरे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
सातारा: शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी प्रशांत शंकर जगताप (वय २६, रा. शेंदुरजणे, ता. वाई) याला जिल्हा न्यायाधीश-२ एन. एल. मोरे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड, दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, आरोपी प्रशांत जगताप व पीडित मुलीची ओळख होती. या ओळखीतून त्याने ७ मार्च २०१५ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तिच्याशी गोड बोलून तिला दुचाकीवरून खानापूर, ता. वाई गावच्या हद्दीतील एका ऊसाच्या शेतात नेले.
या ठिकाणी त्याने संबंधित पीडित मुलीवर अत्याचार केला. तसेच या प्रकारानंतर पंधरा दिवसांत पुन्हा त्याने पीडित मुलगी घरात एकटी असताना अत्याचार केला. यातून संबंधित मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार समोर आल्यानंतर वाई पोलिसांनी प्रशांत जगताप याला अटक केली.
पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी प्रशांत जगताप याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सहायक जिल्हा सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. या खटल्याच्या कामकाजात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भूतकर, सेशन कोर्टचे पैरवी पोलीस कॉन्स्टेबल ज्योतीराम शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले.
बाळंतपणानंतर मुलीचा मृत्यू..
अत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिने पोलिसांना प्रशांत जगतापने केलेल्या कृत्याची सविस्तर तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, न्यायालयात खटला सुरू असताना तिचा बाळंतपणानंतर दुर्देवी मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.