दहा तरुणींचा तीन दिवस महामार्गावरच मुक्काम; कर्नाटककडून परवानगी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 04:03 AM2020-05-28T04:03:13+5:302020-05-28T06:31:14+5:30
दोन्ही राज्याच्या पोलिसांत हमरीतुमरी, नवी मुंबईला परत पाठवले
- जहाँगीर शेख
कागल (जि. कोल्हापूर) : कोरोनामुळे स्थलांतरित होत असलेल्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपल्याच राज्याने प्रवेश नाकारल्याने १० तरुणींनी येथील दूधगंगा नदी पुलाजवळ महामार्गाच्या मधोमध तब्बल तीन दिवस मुक्काम केला. या मुली नवी मुंबईहून उत्तर कर्नाटकातील अकोला येथे जाणार होत्या. मात्र, प्रवेश न मिळाल्याने पुन्हा मुंबईला परतावे लागले.
नवी मुंबईतील नेरूळ येथून २० ते २२ वर्षांच्या तरुणी खासगी वाहनाने २३ मे रोजी कागलजवळ कर्नाटक पोलिसांच्या तपासणी नाक्यावर आल्या. त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचे रितसर पत्र होते; पण कर्नाटक राज्याचा ई पास नव्हता, म्हणून त्यांना अडविण्यात आले. त्यांनी नातेवाइकांच्या मदतीने प्रवेश पास उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला; पण कर्नाटकने एक जूनपर्यंत ही सेवा बंद केल्याचे सांगितले. शेवटी या उच्चशिक्षित मुली तपासणी नाक्याजवळ महामार्गाच्या मधोमध असलेल्या जागेत दिवसभर झाडाझुडपांच्या सावलीत बसत आणि रात्री तेथेच अंग दुमडून झोपी जात.
कर्नाटक पोलिसांकडून ह्यह्यपरत जा, परत जाह्णह्ण हे दरडावणे तर सुरूच होते. २५ मे रोजी कर्नाटकातील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी येथे आले. त्यांनी या मुलींना पाहताच यांना महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन करा, असे आदेश दिले; त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी या मुलींना कागलच्या चेक पोष्टवर आणले. महाराष्ट्र पोलिसांनीही विरोध केला. दोन्ही राज्यांच्या पोलिसांत हमरातुमरीही झाली. अखेर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशी चर्चा करून पोलिसांना त्यांना परत नवी मुंबईला पाठविले.