८० कोटींची निविदा बेकायदेशीर
By admin | Published: September 15, 2014 12:40 AM2014-09-15T00:40:48+5:302014-09-15T00:41:35+5:30
इचलकरंजी भुयारी गटार योजना : तक्रार थेट पंतप्रधान मोदींकडे
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या हद्दीतील शहापूर व कबनूर या वाढीव भागांसाठी भुयारी गटारीच्या कामाकरिता नगरपालिकेने ८० कोटी रुपयांची निविदा भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाने मंजूर केल्याची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. मोदी यांनी हे प्रकरण केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नगरोत्थान अभियान या विभागाकडे चौकशीकरिता पाठविले आहे, अशी माहिती तक्रारदार विनय राठी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नगरपालिकेने शहापूर व कबनूर या परिसरातील भुयारी गटारींच्या कामाकरिता २५ आॅगस्ट २०१४ च्या सभेत २१.२१ टक्के जादा दराने ८० कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे. वाढीव दराने निविदा मंजूर केल्याने या कामाचा खर्च १६ ते १७ कोटींनी वाढणार आहे. या खर्चाचा ताण पालिकेवर पर्यायाने नागरिकांना सोसावा लागणार आहे.
याबाबत पालिकेने मक्तेदाराला वर्क आॅर्डर दिली आहे. संबंधित कंपनीला गैरलाभ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याने या सर्व कारभाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन पंतप्रधान मोदी यांनी संबंधित प्रकरण केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नगरोत्थान अभियान या विभागाचे अधिकारी धर्मेंद्रकुमार यांच्याकडे पाठविले आहे, असेही राठी यांनी पत्रकात म्हटले आहे. नगरपालिकेच्या या भुयारी गटार योजनेसंदर्भातील या तक्रारीमुळे खळबळ माजली आहे.