Kolhapur: ‘केशवराव’च्या दुसऱ्या टप्प्यातील सव्वा तीन कोटींची निविदा मंजूर, पुढील आठवड्यात होणार कामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:08 IST2025-04-10T12:08:13+5:302025-04-10T12:08:24+5:30
कामाचा ठेका व्ही.के. पाटील यांना : ७.८८ टक्के कमी दराची निविदा मंजूर

Kolhapur: ‘केशवराव’च्या दुसऱ्या टप्प्यातील सव्वा तीन कोटींची निविदा मंजूर, पुढील आठवड्यात होणार कामाला सुरुवात
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन कोटी २२ लाख रुपयांच्या कामाची निविदा मंजूर झाली असून, कोल्हापूरस्थित ठेकेदार व्ही.के. पाटील यांना काम देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या कामाला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रसिद्ध करण्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जतन, संरक्षणअंतर्गत भिंती, तसेच छताचे अतिशय अवघड असे पहिल्या टप्प्यातील काम गतीने सुरू आहे, लवकरच ते पूर्ण होईल. आता दुसऱ्या टप्प्यातील कलादालनजवळील मेकअप रूम, ग्रीनरूम, ऑफिस, टॉयलेट, बाथरूम, बाजूचे दोन व्हरांडे, खासबाग मैदानाकडील भिंतीचे काम, छत, दरवाजे, खिडक्या, दोन जिने आणि स्टेजचे बांधकाम केले जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी नऊ ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या, त्यापैकी अंतिम निवडीपर्यंत सात ठेकेदार पात्र ठरले. त्यातून कोल्हापुरातील नामवंत ठेकेदार व्ही.के. पाटील यांनी ७.८८ टक्के कमी दराची निविदा भरल्यामुळे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली. ठेकेदार पाटील यांचा कामाचा अनुभव चांगला आहे. त्यांनी याआधी केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण केले होते. छत्रपती शाहू समाधी स्मारकाचे काम त्यांनी केले आहे. ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंग इमारतीचे कामही तेच करत आहेत.
निविदा मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिम प्रस्ताव उपसमितीकडे पाठविण्यात आला असून, पुढील आठवड्यात प्रशासकीय मान्यता झाल्यावर कामाला सुरुवात केली जाणार आहे. या कामाची मुदत तीन महिने आहे. ठेकेदार व महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी संयुक्तपणे भेट देऊन काय काय कामे करायची आहेत, यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अभियंता मिलिंद पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील कामही तितक्याच गतीने व्हावे, म्हणून या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. निविदा काढण्यास मान्यता झाली आहे.
११ कोटी ७७ लाखांची होणार कामे
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांसाठी बुधवारी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ११ कोटी ७७ लाख रुपयांच्या या कामात नाट्यगृहाच्या आतील भागात इंटेरियल, ॲकॉस्टिक (ध्वनिक), विद्युतीकरणासह अनुषंगिक कामांचा समावेश आहे. निविदा मागविणे, निविदापूर्व बैठक, प्राप्त निविदांची छाननी करणे, निगोसिएशन आदी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्यास पुढील एक महिना लागणार आहे. तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू होणार आहेत.