कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:11 IST2025-02-06T12:10:12+5:302025-02-06T12:11:00+5:30
कोल्हापूर : येथील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली ...

संग्रहित छाया
कोल्हापूर : येथील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा जाहीर करण्यास महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे. तीन कोटी २२ लाख रुपये खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील कामेही गतीने करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महापालिकेच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी देताच ही निविदा जाहीर केली जाणार आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहाला दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० वाजता भीषण आग लागून नाट्यगृहाचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. नाट्यगृहाचे छत पूर्णपणे जळाले होते, मजबूत भिंतीना तडे गेले होते. त्यानंतर जनतेतून झालेल्या मागणीनुसार हे नाट्यगृह ‘जसे होते तसे’ बांधण्याचा निर्णय महापालिका तसेच राज्य सरकारने घेतला होता. नाट्यगृहाचा विषय अतिशय संवेदनशील असल्याने त्याच्या पुनर्बांधणीला २५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यातील नाट्यगृहाच्या दगडी भिंती काही अंतरापर्यंत उतरवून पुन्हा बांधणे आणि इमारतीचे संवर्धन अशा सात कोटींच्या कामांचा समावेश होता. ही कामे गतीने सुरू असून, दुसऱ्या टप्प्यातील कामेही अशाच गतीने सुरू व्हावीत म्हणून त्याची निविदा काढण्यास प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली. दुसऱ्या टप्प्यातील तीन कोटी २२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता झाल्यावर लगेच निविदा जाहीर केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कामे
- तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर ग्रीन रूम उभारणे
- इमारतीच्या बाजूच्या पॅसेजमध्ये रूफिंग करणे
- खासबाग मैदानाकडील स्टेज तयार करणे
- फ्लोरिंग करणे, अशा कामांचा समावेश आहे
१२ गुंठे जागा ताब्यात घेणार
नाट्यगृहाच्या दक्षिण बाजूस असलेली महापालिकेची १२ गुंठे जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील आठ गुंठे जागा तालीम संघाला देण्यात आली होती. तर अन्य चार गुंठे जमिनीवर चौदा दुकानदारांनी अतिक्रमण करून जागा व्यापली होती. या सर्वांना नोटिसा लागू करण्यात आल्या असून, ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुढील आठ ते दहा दिवसांत पूर्ण होईल, असे इस्टेट अधिकारी विलास साळोखे यांनी सांगितले.