वसंतदादा कारखान्यासाठी निविदा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 12:57 AM2017-04-18T00:57:10+5:302017-04-18T00:57:10+5:30
वसंतदादा कारखान्यासाठी निविदा जाहीर
सांगली : वसंतदादा शेतकरी साखर कारखाना व डिस्टिलरी भाडेतत्त्वावर देण्यासाठी जिल्हा बँकेने निविदा प्रसिद्ध केली असून, ३ मेपर्यंत निविदा दाखल करण्यासाठी मुदत दिली आहे. निविदेत भाड्याची कोणतीही मूळ रक्कम निश्चित केली नसून, निविदाधारकांनीच त्यांच्या हिशेबाप्रमाणे जास्तीत जास्त रकमेची निविदा दाखल करावी, असे आवाहन केले आहे.
थकीत ९३ कोटी रुपयांच्या कर्जापोटी सांगली जिल्हा बँकेने वसंतदादा कारखान्याचा ताबा घेतला आहे. याच कर्जाच्या वसुलीसाठी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याचा निर्णय बँकेने घेतला होता. त्यासंदर्भातील निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचा भाडेकरार किती वर्षासाठी असावा, याचा निर्णय निविदाधारकांवर सोपविला आहे. कमीत कमी कालावधित जास्तीत जास्त भाडे देणाऱ्या संस्थेला प्राधान्याने कारखाना देण्याचे धोरण यामागे असण्याची चिन्हे आहेत. प्राप्त निविदा कोणतेही कारण न देता स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा अधिकार बँकेने स्वत:कडे राखून ठेवला आहे.
वसंतदादा कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ७ हजार ५00 टन आहे. कारखान्यासह डिस्टिलरी, इथेनॉल, अॅसिटालडिटाईड, अॅसिटिक अॅसिड, अॅसिटिक अनहायड्रॉईड, कंट्रीलिकर बॉटलिंग, यंत्रसामग्री, वापरातील इमारती, गोदामे व अन्य मालमत्ताही भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. इच्छुकांना एक स्वतंत्र युनिट किंवा दोन्ही युनिटसाठी दोन स्वतंत्र निविदा दाखल करता येणार आहेत. निविदा प्रक्रिया ८ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे मे महिन्यात हा कारखाना नव्या संस्थेकडे जाणार आहे. कारखाना चालविण्यास देताना शेतकरी, कामगार, सभासद, वित्तीय संस्था, शासकीय कार्यालये यांच्या देण्यांचा विषय चर्चेला येणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांचे लक्ष निविदा प्रक्रियेकडे लागले आहे.