मांडरे कलासंग्रहालय रूपडे पालटणार निविदा प्रसिद्ध : वर्षभरात काम पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:48 AM2019-06-28T00:48:43+5:302019-06-28T00:49:22+5:30
दिवंगत अभिनेते व चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचा जीवनप्रवास उलगडणारे राजारामपुरी येथील चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय नव्या दिमाखात रसिकांसमोर येणार आहे. वास्तूच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता करण्यात येणाऱ्या या आर्ट गॅलरीत येथील चित्रपटसृष्टीचाही इतिहास मांडण्यात येणार असून,
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : दिवंगत अभिनेते व चित्रकार चंद्रकांत मांडरे यांचा जीवनप्रवास उलगडणारे राजारामपुरी येथील चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय नव्या दिमाखात रसिकांसमोर येणार आहे. वास्तूच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता करण्यात येणाऱ्या या आर्ट गॅलरीत येथील चित्रपटसृष्टीचाही इतिहास मांडण्यात येणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
चंद्रकांत मांडरे यांच्या नावे राजारामपुरी सातव्या गल्लीत असलेले कलादालन त्यांचा जीवनपट, अभिनयाची कारकिर्द आणि चित्रांचे सौंदर्य उलगडते. मांडरे यांची अभिनेता म्हणून ओळख असली, तरी ते चांगले चित्रकारही होते. त्यांनी ४00च्या वर चित्रे रेखाटली. याशिवाय त्यांची चित्रपट कारकिर्द आणि आयुष्यपट उलगडणारी १५० च्या वर छायाचित्रे व त्यांना मिळालेले पुरस्कार येथे आहेत. येथेच ते राहत होते. त्यांनी हा ठेवा १९८४ साली शासनाकडे सुपूर्द केला व त्यासाठी आपली वास्तूदेखील कलादालनासाठी दिली.
शासनाच्या वतीने १९८७ साली ‘चंद्रकांत मांडरे कलादालना’चे उद्घाटन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी शशिकला येथे राहत होत्या. कोल्हापुरातील अन्य सुसज्ज आर्ट गॅलरीप्रमाणे या कलासंग्रहालयाचे स्वरूप असावे, त्याचे नूतनीकरण करावे, अशी त्यांची इच्छा होती; यासाठी संग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील यांनी पुढाकार घेऊन नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठविला.
या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. आॅनलाईन निविदा भरण्यासाठी ११ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली असून, त्यानंतर निविदा मंजुरी, वर्क आॅर्डर निघून कामाला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात एक कोटीचा निधी येईल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हे काम वर्षभर चालणार आहे.
असे असेल नवे कलासंग्रहालय
नूतनीकरणासाठी दोन कोटी ४८ लाखांचा निधी खर्ची पडणार आहे. वास्तूच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता, अंतर्गत बदल करण्यात येणार आहेत. खोल्यांचे स्वरूप बदलून त्याचे आर्ट गॅलरीत रूपांतर करण्यात येणार आहे. वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येईल. मांडरे यांच्या चित्रांचे दालन व चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीचे दालन वेगवेगळे असतील. कोल्हापूरला लाभलेल्या चित्रपटसृष्टीचा इतिहासही मांडण्यात येणार आहे.