कोल्हापुरात पुन्हा तणाव, शिक्षिकेच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:03 PM2023-06-17T12:03:46+5:302023-06-17T12:07:48+5:30
संबंधित शिक्षिकेने निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी यावर कार्यकर्ते ठाम
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गत आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या जखमा अजून मिटत नाहीत, तोच शुक्रवारी उपनगरातील एका नामांकित कॉलेजच्या शिक्षिकेच्या वक्तव्याच्या एका व्हिडिओने तणाव निर्माण झाला. संबंधित शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवताना विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ बनवला असून, शुक्रवारी तो समाजमाध्यमावर माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
या व्हिडिओतील वक्तव्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. संबंधित शिक्षिकेने निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी यावर कार्यकर्ते ठाम राहिले. त्यामुळे निवृत्ती चौकात सायंकाळी मोठा जमाव जमला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढली. मात्र, कार्यकर्ते मागणीवर ठाम होते. घोषणा देत हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोर्चाने निघाल्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. संबंधित प्राध्यापक महिलेची कॉलेजमध्ये सिन्सिअर प्राध्यापक अशी प्रतिमा आहे.
शिक्षिकेवर शिस्तभंगाची कारवाई
दरम्यान, रात्री या संदर्भात केआयटी कॉलेजचे संचालक डॉ. मोहन वनरोटी यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, त्या व्हिडीओमधील वक्तव्याविषयी महाविद्यालय प्रशासन सहमत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाविद्यालयाने पाच जणांची समिती नेमली आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंतच्या कालावधीसाठी शिस्तभंगाची कारवाई म्हणून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. समितीच्या अहवालानंतर संबंधित व्यक्तीवर पुढील कारवाई केली जाईल. कोल्हापूरचा सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे.