‘अतिक्रमणा’वरून तणाव

By Admin | Published: April 21, 2016 12:36 AM2016-04-21T00:36:51+5:302016-04-21T00:36:51+5:30

जयसिंगपूर पालिकेची कारवाई : शिवाजी सोसायटीतील अतिक्रमणे पाडली

Tension on 'encroachment' | ‘अतिक्रमणा’वरून तणाव

‘अतिक्रमणा’वरून तणाव

googlenewsNext

जयसिंगपूर : आम आदमी पार्टीच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत जयसिंगपूर नगरपालिका प्रशासनाने शहरातील सार्वजनिक मिळकतीवर केलेल्या अतिक्रमणावर कारवाईची मोहीम राबविली़ तीन ठिकाणचे अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले़ शिवाजी हौसिंग सोसायटीमधील कारवाईवेळी प्रशासनाला येथील नागरिकांनी विरोध दर्शविला़ मुख्याधिकारी हेमंत निकम व नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे काही काळ तणावपूर्णवातावरण निर्माण झाले होते़ अखेर प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणे काढली.
शहरातील नगररचना आराखड्यातील रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २७ मार्च ते १ एप्रिलअखेर धरणे आंदोलन झाले होते़ त्यावेळी पालिका प्रशासनाकडून कारवाईचे पत्र दिले होते़ मात्र, कारवाई न झाल्याने पुन्हा आम आदमी पार्टीच्यावतीने उपोषण सुरु केले़
बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता़ दरम्यान, उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, अशी प्रशासनाकडून विनंती केली़ मात्र, आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नाही़ तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा घेतला़
दरम्यान, नगरपालिकेने उपोषणाची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला बुधवारी सकाळी अकरा वाजता सुरुवात केली़ शिवाजी हौसिंग सोसायटीमधील शुभांगी मगदूम यांच्या इमारतीचा आरसीसी जिना जेसीबीच्या साहाय्याने काढला़ त्यानंतर शरद पाटील यांचे दोन कंपौंड पाडण्यात आले़
शिवाजी हौसिंग सोसायटीतील अतिक्रमणाबाबत न्यायालयाची मनाई असल्याने तुम्हाला अतिक्रमणाची कारवाई करता येणार नाही, असा पवित्रा डॉ़ पाटील यांनी घेतला़ अतिक्रमणधारक व पालिका पथकांनी थेट पोलिस ठाणे गाठले़ यावेळी पोलिस ठाण्यात सपोनि संतोष डोके यांच्यासमोर दोन्हीकडील वकिलांनी बाजू मांडली़ यातून कोणताच मार्ग न निघाल्याने सरकारी वकिलांचे मत घेतल्यानंतर नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये, तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक मिळकतीवर अतिक्रमण काढण्याचा नगरपालिकेला अधिकार आहे़ यानुसार दुपारी चारच्या सुमारास बी.़ एस़ पाटील यांच्या घरालगत असणारे अतिक्रमण पथकाकडून जमीनदोस्त केली. (प्रतिनिधी)
शाब्दिक खडाजंगी
बुधवारी सकाळी अकरा वाजता लक्ष्मी नारायण मालू हायस्कूलच्या प्रवेशव्दारासमोरील डॉ़ बी़ एस़ पाटील यांच्या घरालगत असणाऱ्या वाहन पार्किंगच्या भिंती पाडण्यासाठी पथक दाखल झाले. अतिक्रमण काढताना जेसीबीला रोखण्याचा प्रयत्न झाल्याने तणाव निर्माण झाला़ मुख्याधिकारी हेमंत निकम व विरोध दर्शविणाऱ्यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली़
अतिक्रमणे काढणार
नगरपालिकेच्या हद्दीतील व शिवाजी हौसिंग सोसायटीमधील (गट नं़१७३२/४) शीलप्रभा पाटील, विद्या कुरडे, बापूसाहेब चौगुले, देवेंद्र माणगावे, आण्णासो पाटील, बी़ एस़ पाटील यांनी सार्वजनिक मिळकतीवर अतिक्रमण केल्याचे नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र गवळी यांनी सांगितले़ ही अतिक्रमणेदेखील काढण्यात येणार आहेत़ मुख्याधिकारी निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली़

Web Title: Tension on 'encroachment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.