कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

By उद्धव गोडसे | Published: June 7, 2023 11:51 AM2023-06-07T11:51:10+5:302023-06-07T12:09:53+5:30

जमावाला अडवताना पोलिसांची दमछाक

Tension in Kolhapur due to offensive status, Hindutva organizations aggressive, stone pelting in the city, strict closure | कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कोल्हापूर शहरात दगडफेक, कडकडीत बंद, आक्षेपार्ह स्टेटसवरुन तणाव; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

googlenewsNext

कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.

सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली.

तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ४०० ते ५०० तरुण गंजी गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गंजी गल्ली आणि बिंदू चौकात काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे.

परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवले असून, सध्या पोलिस अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, बिंदू चौकात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद 

कोल्हापुरातील तणावाचे पडसाद जोतिबा डोंगरावर उमटले. संपुर्ण जोतिबा मंदिर मार्गावरील व गावातील दुकाने बंद ठेऊन बंदला नागरिकांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मात्र, भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी दर्शनासाठी जोतिबा मंदिर खुले ठेवण्यात आले होते.

Web Title: Tension in Kolhapur due to offensive status, Hindutva organizations aggressive, stone pelting in the city, strict closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.