Kolhapur: मदरसा इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यावरुन तणाव, अज्ञाताने बसवर केली दगडफेक
By भारत चव्हाण | Published: January 31, 2024 11:20 AM2024-01-31T11:20:25+5:302024-01-31T11:54:27+5:30
पोलिसांनी संबंधित इसमास घेतले ताब्यात
कोल्हापूर : शहरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात असलेल्या मदरसा इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास गेलेल्या महापालिका अधिकारी - कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्याना अटकाव केल्यामुळे आज, बुधवारी सकाळी तणाव निर्माण झाला. मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने जमल्याने प्रशासनेने करावाई करण्याचे धाडस दाखविले नाही. गेल्या तीन तासापासून तणावपूर्ण स्थिती आहे. लक्षतीर्थ येथे मदरासा इमारत असून तेथे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
दरम्यानच सायंकाळी एका अज्ञाताने दसरा चौक परिसरात एसटी बस तसेच कारवर दगडफेक केली. पोलिसांनी संबंधित इसमास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. तर, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांनी केले.
लक्षतीर्थ वसाहतमधील धार्मिक स्थळ अनधिकृत आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने महापालिका प्रशासनाकडे केली होती. यानंतर या जागेची पाहणी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने केली होती. काही दिवसांनी मुस्लिम समाजाने समजुतीची भूमिका घेत मुस्लिम समाजाने या मदरशामधील साहित्य आणि पत्र्याचे शेड स्वत:हून काढून घेतले होते.
दरम्यान आज महापालिका अधिकारी - कर्मचारी बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास गेले असता यावेळी अटकाव करण्यात आला. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, मुस्लिम बांधवांनी कारवाई करू नका अशी मागणी करत महापालिका प्रवेशद्वाराच्या समोर ठिय्या मारला होता.