विषबाधा झालेल्या दहावीतील विद्यार्थीनीचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 03:06 PM2020-02-25T15:06:45+5:302020-02-25T15:08:06+5:30
पाच दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या शिरटी (ता. शिरोळ) येथील दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यु झाला. सानिका नामदेव माळी (वय १६) असे तिचे नाव असून कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री तिचा मृत्यु झाला. दरम्यान, सानिकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट मंगळवारी सकाळी शिरटी हायस्कूलसमोर ठेवला. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शिरोळ : पाच दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेल्या शिरटी (ता. शिरोळ) येथील दहावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यु झाला. सानिका नामदेव माळी (वय १६) असे तिचे नाव असून कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी मध्यरात्री तिचा मृत्यु झाला. दरम्यान, सानिकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी करीत नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट मंगळवारी सकाळी शिरटी हायस्कूलसमोर ठेवला. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शाळेसमोरच नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तब्बल चार तासानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. सानिका शिरटी हायस्कूल शिरटीच्या दहावीच्या वर्गात शिकत होती.
२० फेब्रुवारीला बाटलीतील पाणी पिल्यानंतर सानिकाला अस्वस्थ वाटू लागले होते. सुरुवातीला तिला शिरोळ येथे त्यानंतर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा मृत्यु संशयास्पद असल्याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे.