नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीची परीक्षा सुरू, मराठी विषयाच्या पेपरने प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 06:56 PM2019-03-01T18:56:52+5:302019-03-01T18:59:47+5:30
शालेय जीवनातून महाविद्यालयीन जगतात प्रवेशासाठीचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. नवीन अभ्यासक्रम, गुणदानाच्या पद्धतीतील बदलानुसार या वर्षी पहिल्यांदाच दहावीची परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव दिसून आला. परीक्षा जरी मुलांची असली, तरी त्यांच्या पालकांची घालमेल सुरू होती.
कोल्हापूर : शालेय जीवनातून महाविद्यालयीन जगतात प्रवेशासाठीचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारी मराठी विषयाच्या पेपरने प्रारंभ झाला. नवीन अभ्यासक्रम, गुणदानाच्या पद्धतीतील बदलानुसार या वर्षी पहिल्यांदाच दहावीची परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव दिसून आला.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत परीक्षा घेण्यात येत आहे. या वर्षी कोल्हापूर विभागातून एकूण १ लाख ४१ हजार ७० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विभागातील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होत आहे.
मराठीच्या पहिल्या पेपरसाठी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थिनींची गर्दी होऊ लागली. पालक हे आपल्या पाल्यांचे बैठक क्रमांक शोधून देत होते. ‘शांतपणे पेपर सोडव’, ‘गडबड करू नको’, ‘सोपे प्रश्न पहिल्यांदा सोडव’, ‘पेपर कव्हर कर’, अशा पेपर सोडविण्याबाबत विविध सूचना ते करीत होते. केंद्राबाहेरील परिसरात काही विद्यार्थ्यांनी नोटस्ची वही, पुस्तकांवर धावती नजर टाकली.
काहींनी संभाव्य प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांबाबत चर्चा केली. परीक्षार्थींना त्यांचे पालक, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या. परीक्षार्थींना पेपरच्या आधी अर्धा तास परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला. मोबाईल, कॅमेरा असलेले स्मार्ट वॉच, पेन हे परीक्षार्थींकडे नसल्याची खात्री करून, प्रवेशपत्राची पाहणी करून परीक्षार्थींना केंद्रात सोडण्यात येत होते. प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता.
सकाळी अकरा वाजता मराठीचा पेपर सुरू झाला. अनेक पालक पेपर सुटेपर्यंत केंद्राबाहेर थांबून होते. नव्या अभ्यासक्रमानुसार पहिलीच परीक्षा असल्याने आपल्या पाल्याने नीट पेपर सोडविला असेल की नाही? त्याला पेपर कव्हर होईल का? पेपर सोपा असेल का? अशा विविध प्रश्नांद्वारे पालकांची पेपर सुटेपर्यंत घालमेल सुरू होती. दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर पहिला पेपर सोपा गेल्याच्या आनंदाने आपले पाल्य परीक्षा कक्षातून बाहेर आल्याचे पाहताच पालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पेपरबाबत चर्चा करीत ते घराच्या दिशेने निघाले.
नवीन अभ्यासक्रमानुसार पहिलीच परीक्षा असल्याने थोडे टेन्शन होते. मात्र, पहिला पेपर सोपा गेल्याने बऱ्यापैकी ते कमी झाले.
- दर्शन खोत,
शनिवार पेठ, कोल्हापूर.
व्याकरणावरील काही प्रश्न वगळता पेपर सोपा होता. मी पूर्ण पेपर कव्हर केला आहे. थोडा वेळ कमी पडला.
- तेजस पोवार,
वळिवडे.