पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटली मराठा वसतिगृहाचा प्रश्न : संस्थांकडून अर्जांची मागणी; विद्यार्थ्यांना सुविधांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:22 AM2018-07-29T01:22:25+5:302018-07-29T01:23:07+5:30
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे.
कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात सुरू करण्याबाबतची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली मुदत उलटली आहे. राज्य शासनातर्फे मार्गदर्शक सूचना उशिरा मिळाल्याने वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक संस्थांच्या अर्ज मागणीची प्रक्रिया दि. २४ जुलैपासून सुरू झाली आहे. .
विचारेमाळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली. मराठा समाजातील ७२ विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय या वसतिगृहामध्ये होणार आहे. पालकमंत्री पाटील यांनी दि. २६ जून रोजी पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी या वसतिगृहाचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाईल. दि. २६ जुलैपर्यंत या वसतिगृहामध्ये मुले प्रत्यक्षपणे राहण्यास येतील, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली.
आतापर्यंत ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्णांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, स्वयंसेवी संस्था नियुक्ती करण्याबाबत राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना मिळण्यास विलंब झाला; त्यामुळे संस्थांकडून अर्र्ज मागविण्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शिष्यवृत्तीपाठोपाठ आता वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विलंब होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नोंदणीकृत संस्थांना सोमवारपर्यंत मुदत
कोल्हापुरातील विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. या वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तर सदस्य सचिवपदी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांची नियुक्ती शासनाने केली आहे. संबंधित वसतिगृह चालविण्यासाठी इच्छुक असलेल्या नोंदणीकृत संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदस्य सचिवांकडे नोंदणीकृत संस्थांनी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार (दि. ३०) पर्यंत आहे. दरम्यान, किती संस्थांचे अर्ज दाखल झाले, वसतिगृहाची सुरुवात कधीपासून होणार, याची माहिती जाणून घेण्यासाठी सदस्य सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.
राज्य सरकारने मराठा समाजासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत अशा योजना जाहीर केल्या; पण त्यांच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही केली नाही. त्यामुळे संबंधित योजना फसव्या ठरत आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह योग्य पद्धतीने आणि किमान १० आॅगस्टपर्यंत तरी सुरू करावे.
- ऋतुराज माने, विद्यार्थी नेते