कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग कधी खुली होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 05:58 PM2024-03-28T17:58:20+5:302024-03-28T17:58:36+5:30
इमारत पूर्ण होण्यासाठीच साडेचार वर्षांचा कालावधी गेला
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरील ऐतिहासिक लूकची टर्मिनल बिल्डिंग गेली चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वास गेली असली तरी कंपन्यांच्या दिरंगाईमुळे ही बिल्डिंग खुली होण्यास आता वेळ लागत आहे. ही इमारत पूर्ण होण्यासाठीच साडेचार वर्षांचा कालावधी गेला आहे. आता पूर्ण होऊनही प्रवाशांना त्याची सेवा मिळत नसल्याने बिल्डिंगच्या दिरंगाईचे रुतलेले चाक कधी बाहेर निघणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
कोल्हापूर विमानतळावर विस्तारीकरणांतर्गत ७२ कोटी रुपयांच्या निधीतून टर्मिनल बिल्डिंग उभारण्यात आली. या बिल्डिंगला जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचा लूक देण्यात आला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या या टर्मिनल बिल्डिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० मार्चला ऑनलाइन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. मात्र, काही किरकोळ कामे राहिली असल्याने ही बिल्डिंग खुली केली नव्हती. ही कामे पूर्ण झाल्यानंतर आज गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार होती. यासाठी विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर पोलिस यांनी पूर्ण तयारीही केली.
मात्र, विमान कंपन्यांकडूनच दिरंगाई होत असल्याने आजचा गुरुवारचा मुहुर्त हुकला आहे. दोन्ही कंपन्यांनी अद्याप बिल्डिंगमध्ये कार्यालये सुरू केली नाहीत. त्यांचे स्लॉट ठरविलेले नाहीत. त्यामुळे ही बिल्डिंग कार्यान्वित करण्यास उशिर होत आहे.
टर्मिनल बिल्डिंगमध्ये काय
-एकावेळी ३०० प्रवाशांची सोय
-१९० कार पार्क करता येतील अशी सुविधा
-एक व्हीआयपी लाउंज