कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग खुली, सौंदर्याने प्रवासी भारावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 03:22 PM2024-03-30T15:22:18+5:302024-03-30T15:23:26+5:30
कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेली आणि गेल्या १० मार्चला उद्घाटन झालेली कोल्हापूर विमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग शुक्रवारी प्रवाशांसाठी खुली ...
कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेली आणि गेल्या १० मार्चला उद्घाटन झालेली कोल्हापूरविमानतळावरील टर्मिनल बिल्डिंग शुक्रवारी प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. सर्वसुविधांयुक्त, आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या या बिल्डिंगचा ऐतिहासिक लूक पाहून प्रवासीही भारावून गेले. यावेळी विमानतळ प्राधिकरण प्रशासनाकडून प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत टर्मिनल बिल्डिंग उभी करण्यात आली. गेल्या साडेचार वर्षांपासून या बिल्डिंगचे काम सुुरू होते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत उभारलेल्या या बिल्डिंगचे १० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले. मात्र, काही किरकाेळ कामे राहिल्याने तिचा वापर सुरू नव्हता.
विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर पोलिस यांच्याकडून तयारी झाल्यानंतर विमान कंपन्यांनीही प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सकाळी नव्या टर्मिनल बिल्डिंगमधून सेवा देण्यास सुरुवात केली. यावेळी आलेल्या प्रवाशांचे विमानतळ प्राधिकरण संचालक अनिल शिंदे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
तिकीट बुकिंगसाठीही गर्दी
सद्य:स्थितीला टर्मिनल बिल्डिंगमध्ये स्टार एअर कंपनीचे तिकीट काैंटर सुरू आहे. प्रवाशांनी नव्या बिल्डिंगमधील या काऊंटरवरही गर्दी केली.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
नव्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये कोल्हापूर पोलिसांसह ७५ सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रवेशित व बाहेर जाण्याच्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
पाच तपासणी काैंटर सुरू
बिल्डिंगमध्ये १० तपासणी काैंटर आहेत. यापैकी सध्या ५ सुरू करण्यात आली. त्यात स्टार एअरचे दोन तर इंडिगोच तीन आहेत.
तिरुपतीचे बुकिंग फुल्ल
येत्या ३१ मार्चपासून कोल्हापूर-तिरुपती ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या विमान सेवेचे पुढील महिनाभराचे तिकीट फुल्ल झाले आहे. ही सेवा पूर्ववत सुरु होणार असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.
काय सुरू झाले
-बिल्डिंगमधील इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम
-ॲड्रेस सिस्टीम
-इन्फॉर्मेशन बोर्ड (माहिती फलक )
-व्हीआयपी लाऊंज
नवी टर्मिनल बिल्डिंग सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी जोडलेली आहे. त्यामुळे प्रवासीही समाधानी आहेत. सध्या प्रवाशांचा प्रतिसादही खूपच चांगला आहे. - नंदकुमार गुरव, व्यवस्थापक, स्टार एअर, कोल्हापूर विमानतळ.