शेतकरी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : वसंतराव मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 01:07 PM2019-11-14T13:07:14+5:302019-11-14T13:08:48+5:30
शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळ अकार्यक्षम असल्याने रोज एक अपहाराचे प्रकरण उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळ अकार्यक्षम असल्याने रोज एक अपहाराचे प्रकरण उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.
गेल्या वर्षभरात शेतकरी संघाच्या सात शाखांत अपहाराच्या घटना घडल्या आहेत. अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई न करता मिटवामिटवी केल्याने अपहार बोकाळल्याचे वसंतराव मोहिते यांनी निदर्शनास आणून दिले. संघावर एक रुपयांचे कर्ज नव्हते, पण या मंडळींनी ८ ते १० कोटींचे कर्ज केले आहे. संचालकच संघाच्या धोरणांची पायमल्ली करत असून लाखो रुपयांचा उधारीवर मालाची उचल केली आहे.
संघाच्या मोक्याच्या जागा आपल्या मर्जीप्रमाणे कोणतीही जाहिरात न देता भाड्याने दिल्या आहेत, त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. एकूणच संघाचा कारभार चिंताजनक असून संस्थेच्या हिताला घातक आहे. सततच्या अपहाराच्या प्रकारामुळे अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सभासदांमधून होत आहे.
संस्थेचे हित आणि सभासदांच्या मागणीचा विचार करून संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासकांची नियुक्ती करावी. त्याचबरोबर गेल्या चार वर्षांत केलेल्या कारभाराची सखोल चौकशी करून संघाचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करून घ्यावे, अशी मागणी वसंतराव मोहिते यांनी केली.
यावर, तक्रारीनुसार संघाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी अॅड. अशोकराव साळोखे, माजी संचालक सुरेश देसाई, प्रभातराव माने (भादोले), वसंत पाटील (वडणगे), संघाचे माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, विजय पोळ आदी उपस्थित होते.
सभासदांबाबत २५ नोव्हेंबरला सुनावणी
शेतकरी संघाचे २३ हजार जुने सभासद विद्यमान संचालक मंडळाने कमी केले आहेत. विरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी होऊन अंतिम सुनावणी २५ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरेश देसाई यांचे सभासदत्वही रद्द केले आहे, त्यास त्यांनी आव्हान दिले असून त्याची सुनावणीही यावेळी होणार आहे.
परवानगीशिवाय नोकरभरती
परवानगीशिवाय नोकरभरती करू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले असताना तो धुडकावत भरती केल्याचे मोहिते यांनी निदर्शनास आणून दिले.