मुदत संपलेल्या बाजार समित्या बरखास्त करणार
By admin | Published: November 7, 2014 12:15 AM2014-11-07T00:15:18+5:302014-11-07T00:22:08+5:30
चंद्रकांतदादा : अध्यादेश सोमवारी काढणार
कोल्हापूर : राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे, अशा सर्व बाजार समित्या तातडीने बरखास्त करून तेथे प्रशासक मंडळ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचा अध्यादेश सोमवारी (दि. १०) काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, गुरुवारी ‘लोकमत’ला दिली.
मंत्री पाटील म्हणाले, राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या अनेक जिल्हास्तरीय
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत
संपली असल्याचे निदर्शनास आले आहे.
तथापि, सहकार कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत मागच्या सरकारने अशा मुदत संपलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देऊन सहकार्य केले आहे; पण यापुढे कसलीही मुदतवाढ न देता, त्या बरखास्त करण्यात येतील. याबाबतचा अध्यादेश सोमवारी जारी केला जाईल.
ज्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे, परंतु तिथे प्रशासक मंडळ नेमले आहे, अशा समित्यांच्या बाबतीतही योग्य तो निर्णय घेण्यात येईल. (प्रतिनिधी)