पशुखाद्य, दुधाच्या अटीने अनेकांच्या दांड्या गुल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:47+5:302021-04-02T04:23:47+5:30
लोकमत न्यूज नेेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ...
लोकमत न्यूज नेेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची सोमवारी (दि. ५) छाननी होणार असून, दहा टन पशुखाद्य व वर्षाला ४० हजार लिटर दूध पुरवठा या अटीने राखीव गटातील अनेकांच्या दांड्या गुल होणार आहेत. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून, २ मे रोजी मतदान होणार आहे.
‘गोकुळ’साठी दाखल झालेल्या अर्जांची सोमवारी सकाळी अकरा ते संपेपर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच संबंधित इच्छुकाला छाननीबाबतची नोटीस लागू केली आहे. एकाच इच्छुकांनी तीन-चार अर्ज दाखल केले आहेत. ते सगळे एकत्र करून त्यांची छाननी केली जाणार आहे. अर्ज सोपा असल्याने त्यामध्ये फार कमी जणांच्या चुका असणार आहेत. छाननीमध्ये बहुतांशी जणांना दहा टन पशुखाद्य व ४० हजार लिटर दूध पुरवठ्याची अट अडचणीची ठरणार आहे. राखीव गटातील अनेकांच्या दांड्या उडण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती, जमाती गटातील उमेदवारांना जातीचा दाखला पुरेसा आहे. त्याबाबत पडताळणीचे बंधन नाही.
उमेदवार किंवा सुचकालाच प्रवेश
छाननीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. छाननीवेळी संबंधित उमेदवार किंवा सुचकालाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना वकिलांच्या मार्फत बाजू मांडायची आहे, त्यांना सोबत आणण्याची परवानगी दिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
छाननीमध्ये याची लागणार चाळण
पंच कमिटीने आपल्या प्रतिनिधीला संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक लढविण्याबाबत अधिकार दिल्याचा ठराव.
ज्या संस्थेचा ठराव आहे, त्या संस्थेच्या पंच कमिटीत असणे बंधनकारक आहे.
प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने संघाच्या लगतच्या ३१ मार्चला सभासद होऊन तीन वर्षे पूर्ण केली असली पाहिजेत.
संघास वर्षातील २४० दिवस व ४० हजार लिटर दूध पुरवठा केला पाहिजे.
संबंधित संस्था ऑडिट झालेल्या शेवटच्या वर्षी ‘अ’ अथवा ‘ब’ वर्ग गरजेचा.
संघाचे कोणत्याही प्रकारचे देणे थकीत नसावे.
संलग्न संस्थेने सलग तीन वर्षे प्रत्येक वर्षी दहा टन पशुखाद्य संघाकडून घेतले पाहिजे.