तेरणीच्या शाळेत विद्यार्थ्यांशी जमिनी बोलतात

By admin | Published: January 1, 2016 09:10 PM2016-01-01T21:10:29+5:302016-01-02T08:28:56+5:30

मनोहर कोरवींचे प्रयत्न : महाराष्ट्रातील कन्नड भाषिक गावातील मुलांना लावली मराठीची गोडी

In Terni school, students speak land | तेरणीच्या शाळेत विद्यार्थ्यांशी जमिनी बोलतात

तेरणीच्या शाळेत विद्यार्थ्यांशी जमिनी बोलतात

Next

एम. ए. शिंदे -- हलकर्णी --तेरणी हे गडहिंग्लज तालुक्यातील कन्नड भाषिक गाव. इथे घरी आणि समाजात विद्यार्थ्यांच्या कानी पडतात ते कन्नड शब्दच. मात्र, येथील मराठी शाळेतील शिक्षकांनी शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात मराठीची गोडी निर्माण केली आहे. या शाळेत ई-लर्निंग आणि बोलक्या जमिनी आहेत. शिक्षक चांगल्यासाठी धडपडणारे असले की, शाळेचा चेहरा मोहरा बदलून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो याचे तेरणी मराठी शाळा हे एक उत्तम उदाहरण आहे.
ह्या शाळेतील कवीचे मन आणि चित्रकाराची बोटे असलेले सहायक शिक्षक मनोहर कोरवी यांनी पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित बोलक्या जमिनी तयार केल्या आहेत. सर्व आकृत्या, दर्शक तक्ते, आॅईल पेंटमध्ये जमिनीवर तयार केल्या आहेत. त्यातून विद्यार्थी स्वत: ज्ञानार्जन करू शकतो. पहिलीच्या वर्गात काना, मात्रा, वेलांटी याचे ज्ञान देणारे बाराखडी चक्र, बेरीज-वजाबाकी, पुढील, मागील संख्या ओळखणे, सामान्य विज्ञान चक्र, अक्षरापासून शब्द निर्मिती, मुक्तछंद कलाकृती, वारचक्र, अंकी अक्षरी संख्या लेखन असे, इयत्तानिहाय अभ्यासक्रम चित्रित केले आहेत.
शाळा समाजाभिमुख बनविल्यामुळे लोकवर्गणी आणि मुंबईकर मंडळी यांच्या प्रयत्नाने एक लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव झाला. त्यातून ई-लर्निंगची योजना राबविली. संगीत साहित्य आणि प्रिंटरची सुविधा उपलब्ध केली. प्रत्येक वर्गाला अर्धा तास ई-लर्निंगद्वारे अद्यापन केले जात आहे.
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करवून घेतली जाते. सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धेत शाळेला यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले
दत्तक-पालक योजनेमध्ये शाळेने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.
बसवेश्वर दूध संस्थेने संगणक दिला असून, स्पर्धेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च ही संस्था करते. संगमेश्वर विकास सेवा सोसायटीच्या बचत गटातर्फे दिला जाणारा पोषण आहार उत्कृष्ट असून, शासनाच्या निकषांनुसार सर्व मेनू दिले जातात.
माजी उपसभापती अरुणराव देसाई हे मुलांना क्रीडा स्पर्धेच्यावेळी सेंद्रिय गूळ खायला देतात. हे येथील वैशिष्ट्य आहे. अनेक शाळांची पटसंख्या ढासळत असताना येथे पहिली ते सातवीच्या वर्गात ३२५ विद्यार्थी आहेत. १२ शिक्षक कार्यरत आहेत. सेवानिवृत्तीच्या अंतिम पर्वामध्ये असलेले मुख्याध्यापक दत्तात्रय दोरुगडे यांनी सहकारी शिक्षक, ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचा साधलेला विकास कौतुकास्पद आहे.


पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण
प्रत्येक इयत्तानिहाय चित्रित अभ्यासक्रमामुळे आकलन सोपे
बाराखडी चक्र, वारचक्र, अंकी, अक्षरी संख्या लेखन, मुक्तछंद कलाकृती यामुळे आनंददायी शिक्षण
प्रत्येक वर्गाला अर्धा तास
ई-लर्निंगद्वारे अध्यापन

Web Title: In Terni school, students speak land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.