ट्रक-बोलेरोची धडक होऊन भीषण अपघात: ३ तरुणांचा जागीच मृत्यू; चौघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 09:16 AM2024-09-11T09:16:28+5:302024-09-11T09:16:58+5:30
अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
सोळांकुर: निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात सोळांकुर (ता. राधानगरी) येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर झाले आहेत.
राधानगरी तालुक्यातील सरवडे व मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (२८), आकाश आनंदा परीट (२३) आणि रोहन संभाजी लोहार (२४) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळाहून मिळेलेली माहिती अशी की, ११ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर ट्रक (क्रमांक केए२८ AA ८२०६) ने बोलेरो ( MH 42 H ३०६४) हिला समोरून धडक दिली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार, सर्वजण रा. सोळांकुर, हे जागीच ठार झाले, तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, या अपघातानंतर फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार (वय ४१, रा. सोळांकुर) यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.