भयग्रस्त माणसे.. मदतीची प्रतीक्षा... अन् कचऱ्याची दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 01:04 AM2019-08-12T01:04:47+5:302019-08-12T01:04:51+5:30

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चारीही बाजूंनी महापुराचा वेढा... ८५ टक्के गाव पाण्याखाली... राहिलेल्या उंचवट्यावरील भागातील ...

Terrified people .. Waiting for help ... And the smell of waste | भयग्रस्त माणसे.. मदतीची प्रतीक्षा... अन् कचऱ्याची दुर्गंधी

भयग्रस्त माणसे.. मदतीची प्रतीक्षा... अन् कचऱ्याची दुर्गंधी

googlenewsNext



चंद्रकांत कित्तुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : चारीही बाजूंनी महापुराचा वेढा... ८५ टक्के गाव पाण्याखाली... राहिलेल्या उंचवट्यावरील भागातील घरांमध्ये खचाखच भरलेली भयग्रस्त माणसे... शासकीय मदत कधी पोहोचते याची सुरू असलेली प्रतीक्षा... महापुराच्या पाण्यामुळे मेलेल्या जनावरांच्या आणि कुजलेल्या कचºयाची दुर्गंधी, यामुळे होणारी असह्य घालमेल, अशा परिस्थितीत कुरुंदवाड
शहरातील उरल्यासुरल्या माणसांना रहावे लागत असल्याचे चित्र रविवारी होते.
‘लोकमत चमू’ने रविवारी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेतली असता मिळालेली माहिती अन् प्रत्यक्षातील स्थिती खूपच वेगळी असल्याचे जाणवले. कुरुंदवाड हे पंचवीस हजार लोकसंख्येचे शहर. श्री दत्तात्रेयांच्या नृसिंहवाडीमुळे कुरुंदवाड शहरही सर्वांच्या परिचयाचे. आजपर्यंत कधीही आला नव्हता असा महापुराचा अनुभव हे शहर सध्या घेते आहे.
शहरातील ८५ टक्क्यांहून अधिक भाग महापुराच्या पाण्याखाली गेल्याने शेकडो घरे बुडालेली आहेत. काही घरांचे केवळ छत पाण्यावर दिसते आहे. शहरातील चावडी व राजवाडा परिसर, दिवटे गल्ली, कुंभार गल्ली, दत्त महाविद्यालय आणि एसपी हायस्कूल परिसर एवढाच उंचवट्यावरील भाग महापुराच्या पाण्याबाहेर आहे. चारीही बाजूंनी पाण्याने वेढल्यामुळे गेल्या मंगळवारपासून या शहराचा जगाशी संपर्क तुटलेला आहे. त्यांना पहिली मदत शनिवारी पोहोचली. हेलिकॉप्टरमधून अन्नाची पाकिटे टाकण्यात आली. हीच बाहेरून मिळणारी पहिली मदत. तोपर्यंत पाणी वाढेल तसतसे नागरिक नातेवार्इंकाकडे, शिबिरामध्ये स्थलांतरित होऊ लागले. मंगळवारी महापुराने पुरते वेढले आणि बाहेर जाण्याचे सर्वच मार्ग बंद झाले.
वर उल्लेख केलेल्या शहरातील उंचवट्याच्या भागात अडकलेल्या नागरिकांनी एकमेकांना आधार देत जगण्याची लढाई चालू ठेवली. उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, नगरसेवक जवाहर पाटील, माजी नगरसेवक बाळिशा दिवटे, दादा पाटील, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जिनगोंड पाटील, अरुण आलासे, आनंद पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, अभिजित पाटील, किरण जोंग यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी शहरात
अडकलेल्या नागरिकांना आधार दिला आहे. पुराच्या पाण्यात जाऊन माणसांना बाहेर काढले आहे.
सध्या चार माणसे ज्या घरात रहात होती, त्या घरात पंधरा-वीस, तर दुमजली, तीन मजली इमारतीत शंभर-दीडशे लोक दाटीवाटीने रहात
आहेत.
कुरुंदवाडमधील परिस्थिती सांगताना तेथे अडकेले विजय टारे म्हणाले, शासनाने वेळेत मदत न दिल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले; पण शहरातील नागरिकांनीच केवळ शेजारधर्म नव्हे, तर माणुसकीचा धर्मही जागवला आहे. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर उद्भवणाºया रोगराईला तोंड कसे द्यायचे, याची चिंताही सर्वांना लागून राहिली आहे.

शासकीय मदतीला उशीर
रविवारी हेलिकॉप्टरने मदत देण्यात आलीच शिवाय बोटीनेही मदत पोहोचविली गेली. त्यात पाणी उतरू लागल्याने या सर्वांच्या चेहºयावर दिलासा मिळाल्याचे भाव होते. मात्र, शासकीय मदत वेळेत न पोहोचल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता.
जनावरे रस्त्यावर
महापूर वाढेल तसे नागरिकांनी जनावरांना रस्त्यावर तसेच इमारतींमध्ये ठेवले आहे. ही जनावरेही अंत्यत दाटीवाटीने उभी आहेत. त्यांना जगण्यापुरते चारापाणी कसेतरी उपलब्ध करून दिले जात आहे. या जनावरांचेही प्रचंड हाल होत आहेत. अनेक जनावरे वाहून गेल्याचेही समजते.
अनेक घरांची पडझड
शहरातील पुराच्या पाण्यात बुडालेल्या अनेक घरांची पडझड झाली आहे. पूर उतरताच जुनी असलेली आणखी घरे कोसळतील असे चित्र आहे. त्यामुळे घरांची पडझड झालेल्यांना निवारा देण्याचे आव्हानही मोठे असणार आहे.

Web Title: Terrified people .. Waiting for help ... And the smell of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.