अपयश लपविण्यासाठीच सरकारी यंत्रणांची दहशत, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 11:50 AM2022-04-08T11:50:01+5:302022-04-08T11:50:33+5:30

भाजप सरकारची धोरणे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्राच्या खाईत ढकलत आहे

Terror of government agencies to hide failures, Prithviraj Chavan allegation | अपयश लपविण्यासाठीच सरकारी यंत्रणांची दहशत, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

अपयश लपविण्यासाठीच सरकारी यंत्रणांची दहशत, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Next

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, आपले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना, राजकीय नेत्यांना खोट्या खटल्यात अडकविण्याचा उद्योग सुरू आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीसारख्या यंत्रणांचा गैरवापर सुरू केला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरातील वारे वसाहत व सिद्धार्थनगर येथील प्रचारसभेत बोलताना केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सभेत चव्हाण यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. भाजप सरकारची धोरणे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्र्याच्या खाईत ढकलत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी यांना सरकार चालवायला जमत नाही. सरकारी विमान कंपन्या, विमानतळ, रेल्वे, सरकारी जमिनी विकायचे काम सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना नेहमी फसवू शकत नाही. जनता आता शहाणी झाली आहे. भाजपची सत्ता उधळून लावण्याची सुरुवात कोल्हापुरातून होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

वैचारिक राजकारण करण्याऐवजी वैयक्तिक पातळीवर जाऊन विरोधक टीका करू लागल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. महागाई, बेरोजगारी वाढविणाऱ्या आणि देशात खासगीकरणाद्वारे फक्त अंबानी, अदानी यांना मोठे करणाऱ्या भाजपला मते मागण्याचा हक्क राहिलेला नाही, कोल्हापूरची ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती, भाजपने ती करून दिली नाही. परंतु छत्रपती ताराराणीची ही भूमी आहे. त्यामुळे जयश्री जाधव यांना आमदार करून ताराराणीचा वारसा जपला जाईल, असे त्या म्हणाल्या.

गोरगरिबांच्या संकटकाळी धाऊन जाणाऱ्या चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्याकरिता जयश्री जाधव तुमच्या समोर आल्या आहेत, त्यांच्या विजयात सिद्धार्थनगरचा वाटा मोठा असेल, असा विश्वास मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार जयंत आसगावकर, जयश्री जाधव, वसंत लिंगनूरकर यांची भाषणे झाली. निशिकांत सरनाईक, सुशील कोल्हटकर, जय पटकारे, लता कदम, शारंगधर देशमुख उपस्थित होते.

Web Title: Terror of government agencies to hide failures, Prithviraj Chavan allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.