दत्तवाडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:45 AM2021-03-04T04:45:38+5:302021-03-04T04:45:38+5:30
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे भटक्या कुत्र्यांचे हल्ले सुरूच असून बुधवारी सकाळी सहा वर्षांच्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला केला. ...
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथे भटक्या कुत्र्यांचे हल्ले सुरूच असून बुधवारी सकाळी सहा वर्षांच्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला केला. तर सोमवारी (दि. १) दूधगंगा नदीकाठी एका शेतकऱ्यावर कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला झाला. त्यामुळे शेतकऱ्यासह ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मंत्री व खासदारांनी आदेश देऊनही प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी (दि. १) शेतकरी प्रकाश गोरे दूधगंगा नदीकाठी गवत कापण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला करून हाताला व एका बाजूला चावा घेतला. त्यात ते गंभीर जखमी झाले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने कुत्र्यांनी धूम ठोकली. तर बुधवारी सकाळी शिवाजी चौक येथे राधा कुमार लाटवडे (वय ६, रा. तारदाळ) या सहा वर्षांच्या बालिकेवर कुत्र्यांनी हल्ला करून तिचा चावा घेतला.
यापूर्वी कुत्र्यांनी हल्ला करून एका महिलेचा बळी घेतला आहे. तर अनेक जनावरे व माणसांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व खासदार धैर्यशील माने यांनी दत्तवाड येथे भेट देऊन बळी गेलेल्या महिलेच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तर जखमींची विचारपूस करून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका व सांगली महानगरपालिका येथील डॉग स्कॉड पथकाने व वजीर रेस्क्यू फोर्सने काही काळ मोहीम राबवून कुत्र्यांचा बंदोबस्त केला होता. मात्र, पुन्हा असे हल्ले सुरु झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून परिसरातील सर्वच कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.