करंजगाव येथील जवानाचा आसाममध्ये मत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 02:27 PM2022-03-10T14:27:03+5:302022-03-10T22:12:10+5:30
करंजगाव ( ता. चंदगड) येथील १७ मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २८) याचा आसाममध्ये सेवा बजावत असताना मत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुःखद घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी उशिरा कळवली.
चंदगड - करंजगाव ( ता. चंदगड) येथील १७ मराठा लाईट इन्फंट्रीचा जवान नितेश महादेव मुळीक (वय २८) याचा आसाममध्ये सेवा बजावत असताना मत्यू झाला. ही घटना बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या दुःखद घटनेची माहिती त्याचे वडील महादेव मुळीक यांना लष्कर सेवेतील अधिकाऱ्यांनी बुधवारी उशिरा कळवली. त्यामुळे करंजगावसह चंदगड तालुका शोकसागरात बुडाला आहे.
आसाम येथील सीमेवर नितेश हे सेवा बजावत होते. त्याचा बुधवारी मत्यू झाला. नितेशचे वडील महादेव मुळीक हे सैन्यातून निवत्त झाल्यावर २०१४ साली तो १७ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाला होता. त्याचे माध्यमिक शिक्षण करंजगावात तर उच्च माध्यमिक शिक्षण हलकर्णी येथे झाले होते. काही दिवसापूर्वी तो सुट्टीवरही आला होता. आपली पत्नी गरोदर असून तिच्या बाळतंणात सुट्टीवर येतो असे सांगूनही तो गेला होता. पण या घटनेमुळे त्याची ती इच्छा ही अपुरी राहीली. बुधवारी सायंकाळी नितेशच्या निधनाचा निरोप समजताच कुंटुबियांनी एकच हबंरडा फोडला. गुरुवारी त्यांच्या सांत्वनासाठी नातेवाईक तसेच तालुक्यातील अनेक लोकांनी भेट घेतली.
नितेश मुळीक यांचे पार्थिव शुक्रवारी बेळगाव जवळील सांबरा येथील विमानतळावर आणण्यात येणार आहे. तेथे त्यांच्या युनिटच्यावतीने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पार्थिव करंजगावात आणले जाणार आहे. करंजगाव येथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ग्रामस्थांनी नितेशच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरू ठेवली आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. त्याची पत्नी सहा महिन्यांची गरोदर आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, काका, पत्नी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.