नवदाम्पत्याचा खून ‘आॅनर किलिंग’च!

By admin | Published: December 18, 2015 01:11 AM2015-12-18T01:11:02+5:302015-12-18T01:17:00+5:30

बावड्यातील प्रकरण : दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Terrorist murders killer killer! | नवदाम्पत्याचा खून ‘आॅनर किलिंग’च!

नवदाम्पत्याचा खून ‘आॅनर किलिंग’च!

Next

कोल्हापूर : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून दोन सख्ख्या भावांसह तिघांनी नवदाम्पत्याचा खून केल्याप्रकरणी थेरगाव (ता. शाहूवाडी) येथील दोघांसह तिघांना शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी (दि. १६) मध्यरात्री उशिरा अटक केली. गणेश महेंद्र पाटील (वय २०), त्याचा सख्खा भाऊ जयदीप (१९, दोघे, रा. थेरगाव) व मित्र नितीन रामचंद्र काशीद (२२, सातवे, ता. पन्हाळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कसबा बावडा येथील गोळीबार मैदानानजीकच्या गणेश कॉलनीमध्ये इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी (२८) व मेघा (२१) यांचा घरात घुसून चाकूने सपासप वार करुन बुधवारी रात्री निर्घृण खून केला. दरम्यान, गुरुवारी न्यायालयाने या तिघांना सोमवार
(दि. २१) पर्यंत पोलीस कोठडी दिली. हे खून म्हणजे ‘आॅनर किलिंग’चा प्रकार असल्याचे सकृत्दर्शनी स्पष्ट होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, थेरगाव येथील मेघा पाटील हिचे वारणानगर येथे बी. एस्सी.पर्यंतचे शिक्षण झाले. तिचे बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथील इंद्रजित कुलकर्णी याच्याबरोबर शालेय जीवनापासून प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या प्रेमविवाहाला दोघांच्याही घरच्यांचा तीव्र विरोध होता. तरीही, दोघांनी दीड वर्षापूर्वी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर ते बाहेर राहू लागले. यामुळे गावात पाटील यांच्या मुलीने आंतरजातीय मुलाशी विवाह केला, अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेला पाटील कुटुंब कंटाळले.
दरम्यान, बुधवारी (दि. १६) गणेश पाटील यांच्या नातेवाइकांमध्ये विवाह होता. या विवाहावेळीसुद्धा ही याची चर्चा झाली. यातून गणेश व जयदीप या दोघांना राग अनावर झाला. त्यांनी इंद्रजित व मेघा या दोघांचा खून करण्याचे ठरविले. त्यानुसार वरातीला जातो, असे सांगून ते दोघे घरातून बाहेर पडले. मित्र नितीन काशीद याला घेऊन तिघेजण दुचाकीवरून गणेश कॉलनी येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आले. त्यांपैकी नितीन काशीद हा दुचाकी घेऊन रस्त्यावर टेहळणी करीत थांबला. गणेश व जयदीप मेघा हिच्या घरात गेले. त्यावेळी मेघा व तिचा पती इंद्रजित हे दोघे घरात होते. मेघा हिने आपला भाऊ आला म्हणून पती इंद्रजितला दूध व इतर साहित्य आणण्यासाठी दुकानात पाठविले. इंद्रजित बाहेर गेल्यावर मेघा ही चहा करण्यासाठी स्वयंपाक खोलीमध्ये गेली. त्यावेळी भावांनी तिला पाठीमागून धरून तिच्या तोंडात बोळा घातला. तिला स्नानगृहात नेऊन तिच्यावर चाकूहल्ला केला. यात मेघा जागीच ठार झाली.
थोड्या वेळाने इंद्रजित घरात परतताना गणेश व जयदीप या दोघांनी त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. चाकूचा वार वर्मी लागल्याने इंद्रजित किंचाळला. त्याचा आवाज ऐकून घरमालकीण वंदना माधव या घरातून बाहेर जिन्याजवळ आल्या. त्यावेळी रक्ताने माखलेला चाकू घेऊन जिन्यावरून दोघेजण पळत त्यांच्याजवळ आले व वंदना यांना ढकलून ते पसार झाले. गणेश कॉलनीत नवदाम्पत्याचा खून झाल्याचे समजताच पोलीस दल हडबडून जागे झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी नूतन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे आले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी संशयित गणेश पाटील, जयदीप पाटील व नितीन काशीद यांना अज्ञात स्थळावरून ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी तिघांना न्यायालयात हजर केले. सायंकाळपर्यंत गुन्ह्यात वापरलेला चाकू व दुचाकी पोलिसांनी जप्त केली नव्हती.
‘कोडोली’मध्ये बेपत्ताची नोंद
मेघा ही गायब झाल्यानंतर कोडोली पोलीस ठाण्यात तिच्या नातेवाइकांनी ती गतवर्षी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. काही दिवसांनंतर मेघाने विवाह केल्याचे पाटील कुटुंबीयांना समजले. ‘बेपत्ता’च्या तक्रारीनंतर मेघा व इंद्रजित हे दोघेजण विवाह करून कोडोली पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी मेघा हिने मी पती इंद्रजितबरोबर राहणार असल्याचे सांगितले, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी पत्रकारांना दिली.
मेघाचा भाऊ दिवाळीला आला होता
मेघाचे दोन्ही भाऊ कोल्हापुरातच राहत असल्याने त्यांनी मेघाची संपूर्ण माहिती काढली होती. ती कुठे राहते, कुठे कामाला आहे, याची माहिती या दोघांना होती. मेघाचा एक भाऊ दिवाळीसणाला गणेश कॉलनीत आला होता. त्यानंतर तो पुन्हा बुधवारी (दि. १६) घरी आला. त्यामुळे तो आपल्याला मारेल अशी किंचितशीही कल्पना तिला नव्हती; पण तिच्या भावाने वेळ साधली.
इंद्रजितच्या घरच्यांचे येणे-जाणे
इंद्रजित कुलकर्णी याच्या विवाहानंतर त्याचे नातेवाईक येथे येत असत. मध्यंतरी त्याची आजी येथे आली होती, असे नागरिकांनी यावेळी सांगितले. पण, मेघा यांच्या घरातील कोणीही व्यक्ती येथे नसत.
पोलिस अधिक्षकांना आज भेटणार
दरम्यान गुरुवारी सायंकाळी येथील श्रमिक हॉलमध्ये कोल्हापुरातील कांही पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी अतूल दिघे होते. त्यामध्ये खुनाचे प्रकरण हे आॅनर किलींगच असल्याने या प्रकरणाचा निषेध करून पोलिसांनी आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह केलेल्या दांपत्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणाचा छडा लावावा अशीही मागणी बैठकीत करण्यात आली.

Web Title: Terrorist murders killer killer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.