तेरवाडमध्ये पंचगंगा पात्राला जलपर्णीचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:26 AM2021-01-25T04:26:23+5:302021-01-25T04:26:23+5:30
कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी ...
कुरुंदवाड : पंचगंगा नदी पात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यामुळे दूषित पाण्याबरोबर जलपर्णीचे संकट निर्माण होत असल्याने जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच नियोजन करून नदीपात्राला जलपर्णीमुक्त करणे गरजेचे आहे.
दरम्यान, पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधा-याला तुंबलेली जलपर्णी पाटबंधारे विभागाचे अधिकारी पांडुरंग पाटील यांनी रविवारी दुपारी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या लोकांच्या मदतीने बंधा-याचे बरगे काढून पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी हटविली. मात्र जलपर्णी नदीपात्रात पुढे ढकलल्याने शिरोळ अथवा कृष्णा नदीवरील राजापूर बंधा-यावर संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे जलपर्णी जेसीबीच्या साहाय्याने पात्राबाहेर काढण्यात यावी, अशी मागणी नदी प्रदूषणविरोधी चळवळीचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी केले आहे. पंचगंगा नदी पाणी प्रदूषणाबरोबर जलपर्णीचे संकट प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात तीव्रतेने जाणवते. गतवर्षी उन्हाळ्यात कोरोना संसर्गामुळे औद्योगिक कारखाने बंद असल्याने नदी ब-याच अंशी प्रदूषणमुक्त झाली होती. परिणामी स्वच्छ पाण्यामुळे जलपर्णीही निर्माण झाली नव्हती.
गेल्या दोन महिन्यापासून औद्योगिक कारखाने पूर्ववत सुरू झाल्याने औद्योगिक कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने नदी प्रदूषण पुन्हा गंभीर बनली आहे.
प्रदूषित पाण्यावर हिवाळ्यात जलपर्णी उगवते. उन्हाळ्यात उग्ररूप धारण करून नदीपात्रात सुमारे तीन ते चार फूट जाडीचा थर घट्ट विणल्यामुळे पाण्याला सूर्यप्रकाश न मिळाल्याने जलचर प्राण्याबरोबर पाणी स्वच्छ करणारे मासेही मृत्युमुखी पडतात. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नदी प्रदूषण करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने काही अंशी पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असले तरी अद्याप बाल्यावस्थेत असलेली जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी पंचगंगाकाठच्या नागरिकांतून होत आहे.
फोटो - २४०१२०२१-जेएवाय-०१, ०२ फोटो ओळ - ०१) पंचगंगा नदीवरील तेरवाड (ता. शिरोळ) बंधारा परिसरात नदीपात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. ०२) पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी मच्छीमारी करणा-या बागडी समाजाच्या सहकार्याने पात्रातील जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाबरोबर ढकलण्यात येत आहे.