चाचणी परीक्षेचा ताण, नववीच्या मुलाने संपवले जीवन; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 12:26 PM2023-10-10T12:26:21+5:302023-10-10T12:30:38+5:30
आई-वडिलांना बसला मानसिक धक्का
कोल्हापूर : टाकाळा येथील माळी कॉलनी परिसरातील आर्यन देवीदास पालवे (वय १५, सध्या रा. टाकाळा, कोल्हापूर, मूळ रा. एसएनडीटी कॉलेजसमोर, पुणे) याने सोमवारी (दि. ९) दुपारी राहत्या घरात छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेतला.
हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता नातेवाइकांनी वर्तविली आहे.
आर्यन हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील एका बँकेत अधिकारी आहेत, तर आई शिक्षिका आहे. शाळेत चाचणी परीक्षा सुरू असल्यामुळे तो तणावात होता. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आई घरी आल्यानंतर आर्यन त्याच्या बेडरुममध्ये होता. बेडरुमचे दार उघडत नसल्याने त्यांनी पती देवीदास यांना फोन करून बोलवून घेतले.
त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता, त्याने छताच्या फॅनला गळफास घेतल्याचे दिसले. गळफास सोडवून त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांकडे सोपविण्यात आला. मुलाने आत्महत्या केल्याचे समजताच त्याच्या आई-वडिलांना मानसिक धक्का बसला.