शासकीय रुग्णालयातील रुग्णाच्या तपासण्या खासगी लॅबमध्ये, कोल्हापुरात उघडकीस आली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:52 IST2025-01-08T12:51:57+5:302025-01-08T12:52:21+5:30
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या विनामूल्य होत असताना खासगी लॅबची माणसं इथे रक्त, लघवीचे नमुने न्यायला ...

शासकीय रुग्णालयातील रुग्णाच्या तपासण्या खासगी लॅबमध्ये, कोल्हापुरात उघडकीस आली घटना
कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या विनामूल्य होत असताना खासगी लॅबची माणसं इथे रक्त, लघवीचे नमुने न्यायला येतातच कशी, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने सोमवारी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुन्हा या विषयाला वाचा फुटली आहे. अंतर्गत हातमिळवणीमुळेच हे प्रकार घडत असल्याची चर्चा असून, यावर सीपीआर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ब्रिगेडचे रूपेश पाटील हे त्यांच्या रुग्णाला घेऊन ‘सीपीआर’मधील एका विभागात गेले असता त्या ठिकाणी खासगी लॅबचा प्रतिनिधी रक्त, लघवीचे नमुने नेण्यासाठी आल्याचे त्यांना दिसले. याबाबत त्यांनी तक्रार केली. संध्याकाळीही पुन्हा हाच प्रतिनिधी दिसल्यानंतर मात्र त्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली आणि याबाबत पोलिसांत तक्रार देण्यास भाग पाडले. याबाबत त्यांनी अधिष्ठाता यांना निवेदनही दिले आहे. सीपीआर रुग्णालयात बाहेरील खासगी लॅब प्रतिनिधी व काही डॉक्टर हे संगनमत करून रुग्णांचे आर्थिक शोषण करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
सामान्य लोकांपर्यंत सरकारी सुविधा पोहोचू नयेत, असे वातावरण तयार करण्यासाठी अशा अनैतिक कृत्यांना पाठिंबा दिला जातो का, असा सवाल त्यांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. बाहेरील लॅबमध्ये पाठवलेल्यांपैकी ५० टक्के रक्कम डॉक्टर कमिशन म्हणून घेत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे ‘सीपीआर’मध्ये दाखल असलेल्या किती रुग्णांकडे खासगी लॅबचे अहवाल आहेत, याची यादी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
अशी यादी तयार करून या विभागाच्या डॉक्टरांशी चर्चा करून जर यामध्ये त्यांचा संंबंध असेल तर त्यांची नावेही जाहीर करावीत, अशीही मागणी पाटील यांनी केली आहे. सामान्य रुग्णांसाठी एकीकडे शासनाने अनेक चाचण्या मोफत ठेवल्या असताना ही लूटमार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
संघटनेने याबाबत तक्रार केल्यानंतर सोमवारीच पोलिसांत तक्रार दिली आहे. शासकीय रुग्णालयात खासगी लॅबचे प्रतिनिधी येतात याबाबत ही तक्रार आहे; परंतु एवढ्यावर थांबून चालणार नाही. त्यामुळे अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करून खासगी लॅबमध्ये सीपीआरमधील चाचण्या होऊ नयेत यासाठीची नेमकी उपाययोजना करण्यात येणार आहे. - डॉ. शिशिर मिरगुंडे वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर