लीटरला दोन रुपये जास्त देण्यास कटिबध्द विश्वास पाटील यांची ग्वाही : दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:06+5:302021-05-15T04:24:06+5:30
कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये आतापर्यंत विरोधाला विरोधाचे राजकारण कधी झाले नाही आणि आताही ते होणार नाही. दूध उत्पादक केंद्रबिंदू मानूनच ...
कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये आतापर्यंत विरोधाला विरोधाचे राजकारण कधी झाले नाही आणि आताही ते होणार नाही. दूध उत्पादक केंद्रबिंदू मानूनच कारभार करणार असून, नेत्यांनी लीटरला दोन रुपये जास्त देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.
शुकवारी अध्यक्ष निवडीनंतर ते बोलत होते. अध्यक्ष पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आघाडीच्या नेत्यांनी अध्यक्षपदाची संधी दिली, त्या विश्वासास पात्र राहून काम करू. चौघे पराभूत झाले असले, तरी त्यांची मदत पॅनल निवडून आणण्यात यश आले. उत्पादकांना दोन रुपये जादा देणे, वासाचे दुधासह सभासदांना जास्तीत-जास्त परतावा देणे, याकडे गांभीर्याने लक्ष राहणार आहे.
ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले, दूध उत्पादकांचे हित हीच विरोधक आणि आमची टॅगलाईन आहे. ‘गोकूळ’मध्ये एक व्यवस्था आहे, त्यातूनच पुढे जावे लागते. विश्वास पाटील हे मला वरिष्ठ आहेत. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कसब असल्याने त्यांच्याकडे प्रश्न पेलण्याची ताकद आहे. प्रा. किसन चौगले, अजित नरके, बयाजी शेळके, डॉ. सुजित मिणचेकर, अंजना रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.
नूतन संचालकांचा पायगुण
‘गोकूळ’चे रोजचे ७० हजार लीटर दूध संकलन असताना, आपण संचालक झालो, आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नेतृत्वाखाली एक लाख लीटर झाल्यानंतर दिवंगत मुख्यमंत्री वसतंदादा पाटील यांना बोलावून कलशपूजन केले. ईदला विक्रमी दूध विक्री होते. यावर्षी तब्बल १६ लाख १ हजार ८९५ लिटरची विक्री झाली. गेल्यावर्षीपेक्षा २ लाख २८ हजार लिटरने वाढली, हा नूतन संचालकांचा पायगुण असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
आणि आपटेंची खुर्ची आपण घेतली
रवींद्र आपटे यांच्या १४ जानेवारी २०१९ च्या अध्यक्ष निवड सभेत अध्यक्षांच्या खुर्चीवर आपण, तर तिसऱ्या खुर्चीवर आपटे बसले होते. अध्यक्ष निवडीनंतर ते तिसऱ्या खुर्चीवरून अध्यक्षांच्या खुर्चीवर आणि आपण तिसऱ्या खुर्चीत बसलो. त्याचवेळी पुन्हा अध्यक्षांच्या खुर्चीवर आपण बसणार, हे त्यांना सांगितले होते. अशी आठवण विश्वास पाटील यांनी सांगितली.
संचालक मंडळात दोनवेळाच संघर्ष
‘गोकूळ’च्या इतिहासात दोनवेळाच संचालकांत संघर्ष झाला. १२ मार्च १९९० ला आनंदराव पाटील-चुयेकर व अरुण नरके यांना अध्यक्ष निवडीत समान मते पडली आणि चिठ्ठीव्दारे चुयेकर अध्यक्ष झाले. त्यानंतर अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यावरून २८ डिसेंबर २०१८ ला कोरम असताना काही संचालक बाजूला जाऊन बसले. अशा दोनवेळाला संघर्ष झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
३५ वर्षे गायी-म्हैशींच्या सेवेत
संचालक मंडळात उच्चशिक्षित लोक आहेत. सगळ्यात ज्येष्ठ असलो, तरी तुलनेत कमी शिकलेला आपणच असल्याने अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. त्यावर वसंतदादा पाटील हेही चौथी पास होते, असे डोंगळे यांनी सांगितले. शिकण्यासाठी आई-वडिलांचा खूप आग्रह होता, शिकला नाहीस तर गुरं-ढाेरं राखशील. असे सांगत होते आणि खरेच गेली ३५ वर्षे गायी-म्हैशींच्या सेवेत गेल्याचे पाटील यांनी सांगितले.
‘आबाजी’ श्रीकृष्ण, तर डोंगळे ‘बलराम’
विरोधकांना सोबत घेऊन आपणाला दूध उत्पादकांसाठी काम करायचे आहे. ‘गोकूळ’मध्ये विश्वास पाटील (आबाजी) श्रीकृष्ण, तर अरुण डोंगळे ‘बलराम’ असल्याचे अजित नरके यांनी सांगितले.
नावडकर नव्हे, आवडकर
कोरोनाच्या काळात ‘गोकूळ’ची निवडणूक यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संघाच्यावतीने वैभव नावडकर व डॉ. गजेंद्र देशमुख यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, वैभव नावडकर यांचे नाव जरी नावडकर असले तरी त्यांनी सगळ्यांना आवडेल असे काम केल्याने त्यांना ‘आवडकर’ म्हणायला पाहिजे.
खाडे, नरके यांनी केले अभिनंदन
निवड सभेला विरोधी संचालक वसंत खाडे, चेतन नरके, अंबरीष घाटगे व शौमिका महाडिक उपस्थित होत्या. निवड बिनविरोध झाल्यानंतर त्यांनी सभागृह सोडले. त्यापैकी खाडे व नरके यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले.
अंबाबाईचे दर्शन..
सकाळी अकरापासूनच सत्तारूढ गटाचे संचालक ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयात येत होते. अध्यक्षपदाचे नाव गुरुवारी रात्रीच निश्चित झाल्याने विश्वास पाटील यांना तशी कुणकुण होती. त्यामुळे त्यांचे समर्थक ताराबाई पार्क कार्यालयात एकत्रित येत होते. पाटील अंबाबाईचे दर्शन घेऊनच ताराबाई पार्कात आले. तेथून सर्व संचालकांना फेटे बांधून निवड सभेसाठी पाठवण्यात आले.
टीम अजिंक्यतारा सक्रिय
अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत पालकमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक अग्रेसर होते. प्राचार्य महादेव नरके, माजी नगरसेवक मोहन सालपे, भरत रसाळे, डी. डी. पाटील आदी टीम सक्रिय होती.