पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींची स्वच्छतेकडे पाठ
By Admin | Published: March 25, 2015 09:20 PM2015-03-25T21:20:12+5:302015-03-26T00:12:45+5:30
अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज
किरण मस्कर - कोतोली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. हे अभियान गावोगावी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, यापूर्वीही सरकारने गावांना स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अद्यापही अनेक गावांची दिशा व दशा सुधारलेली दिसत नाही. ग्रामपंचायतीसह वरिष्ठ प्रशासनाने स्वच्छता अभियानाकडे लक्ष न दिल्यामुळेच तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित आहेत.स्वच्छता अभियानाबाबत लोकप्रतिनिधींमध्येही उदासीनता दिसून येत असून, ज्या गावात स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे, तेथे घाणीचे साम्राज्य दिसून येते. आजही तालुक्यातील अनेक गावे घाणीच्या विळख्यात असून, नाल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. परिसरातील मटण विक्रेते हे दुकानातील घाण गावच्या बाहेर न टाकता त्या ठिकाणी अथवा जवळपास फेकली जाते. यामुळे गाव परिसर दूषित होण्यास कारणीभूत ठरतात. मात्र, या प्रकाराकडे कोणाचेही लक्ष नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानांकडे लक्ष न दिल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून दुरावलेली आहेत. यामुळे दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अस्वच्छ ग्रामपंचायती
कोतोली, कोलोली, कसबा बोरगाव, तिरपण, घोटवडे, नणुंद्रे, करंजफेण, गोलिवडे, पोर्ले, आसुर्ले, माजगाव, पुनाळ, आळवे, उत्रे, निवडे, उंड्री, तेलवे, आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
‘स्वच्छ भारत’ ही योजना देशभरात सुरू आहे. याचे पालन नियमित संबंधित ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनासह संपूर्ण गावाचा सहभाग मोलाचा आहे.
- बाजीराव उदाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघवे.
पन्हाळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्वच्छ गाव, सुंदर गाव, स्वच्छ घर, स्वच्छ दार अशा विविध योजना घेतल्या आहेत, पण काही ग्रामपंचायतींनी आजही त्या अमलात आणलेल्या नाहीत, तर काहींचा फक्त दिखावा आहे. लवकरच याची माहिती घेऊन निर्णय घेऊ.
- सौ. सुनीता पाटील, सभापती,
पंचायत समिती पन्हाळा.